सातारा

सातारा : गावठी स्वादिष्ट आंब्यांच्या प्रजाती नामशेष

मोनिका क्षीरसागर

सातारा : पुढारी वृत्तसेवा
गेली अनेक वर्षे बाजारपेठेतून गावठी आंब्यांचे प्रमाण नगण्य राहिले असून गावागावातून ही झाडे नामशेष होत चालली आहेत. नावानुसार स्वाद देणार्‍या या गावठी आंब्यांच्या जातींच्या पुनर्निर्माणाचा प्रयत्न व्हायला हवा, अशी मागणी होत आहे. केशर लागवडीसाठी प्रयत्न हवेत नवीन संशोधनातून आंब्यांच्या आता वेगवेगळ्या जाती बाजारात येत असून त्याकडेच लोक आकृष्होताना दिसतात. केशर जातीची आंब्याची झाडे महाराष्ट्रात अद्यापही काही जिल्ह्यात तग धरून असली तरी व्यापारी पध्दतीने त्याची शेती केली जात नाही. हापूस पध्दतीने केशर आंब्यांचे क्षेत्र वाढवून त्याचे मार्केटिंग योग्य पध्दतीने केले तर केशर निश्‍चितच परदेशी बाजारपेठ काबीज करू शकेल. पण, असे प्रयत्न शासनाच्या माध्यमातून व्हायला हवेत.

परदेशी बाजारपेठेतही धमाल

आजचा जमाना हापूस, रायवळ, तोतापुरी, कर्नाटकी अशा आधुनिक विविध जातींच्या आंब्यांचा असून, या आंब्यांच्या जातींनीही नाव कमावले असून, हापूस आंब्यांनी गेली अनेक वर्षे परदेशी बाजारपेठेतही स्थान प्राप्त केले आहे. गेली अनेक वर्षे या हापूस तसेच इतर आंब्यांनी मार्केटमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. या तुलनेत गावठी आंब्यांची झाडे नामशेष होत आल्याने गावठी आंब्यांना आता फारशी मागणी उरलेलीच नाही. त्यांचे प्रमाणही नगण्यच आहे. हापूस तसेच केशर या जातीच्या आंब्यांनी परदेशी मार्केटमध्ये धमाल उडवून दिली आहे.

जुन्या जाती आता केवळ आठवणीतच उरल्या

आजच्या बदलत्या युगात शेतीत मोठ्या प्रमाणात आधुनिक क्रांती झाल्याने पूर्वी साधारणत: 60-70-80 च्या दशकात शेताच्या बांधावर दिसणारी गावठी आंब्यांची झाडे आता कोठेतरी एखाददुसरेच अपवादाने एखाद्या गावात आढळते. पूर्वी केशर आंबा, खोबरी आंबा, केळी आंबा, साखरी आंबा, शेंदरी आंबा, लोद्या आंबा अशा कितीतरी आंब्यांच्या व्हरायटी होत्या. या जाती अस्सल आणि गावरान असल्याने त्याला एक वेगळाच स्वाद होता. प्रत्येक गावात या विविध प्रकारच्या आंब्यांची सुमारे 300 ते 400 झाडे सहज आढळायची. आता एखाद्या गावात गावठी आंब्यांची 10 -15 झाडेच दिसून येतात. बाकीची झाडे काळाच्या ओघात त्यांचे आयुर्मान संपल्यामुळे ती वठून नष्ठ झाली आणि त्यांचे पुनर्रोपण करण्याचा प्रयत्न ना माणसांनी केला ना शासनाने..!

हापूसचा दबदबा…

आज 21 व्या शतकातील बदलत्या युगात सर्वच क्षेत्रात बदल झालेले असून, कृषी विभागही त्याला अपवाद नाही. कृषी क्षेत्रात गेली अनेक वर्षे क्रांती होत असून, पिके व फळांच्या विविध जाती, प्रजाती निर्माण झाल्या. मात्र, आधुनिक क्रांतीने जुने ते सारेच हरवत चालले आहे. ते निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा आहे.

चला तर कामाला लागूया…

शालेय विद्यार्थ्यांना हाताशी धरुन जुन्या आंब्यांच्या झाडांच्या कोयांचे रोपण कृषी विभागाने ठराविक क्षेत्रात केले तर आंब्यांच्या जुन्या जातींचे जतन निश्‍चितच होईल. 'चला तर आत्तापासूनच कामाला लागूया, 2022 गावठी आंबा निर्मितीचे वर्ष बनवूया.

कृषी विद्यापिठांचे प्रयत्न नाहीतच

आज महाराष्ट्रात शासनाची मोठमोठी कृषी विद्यापिठे असून त्यातून पिके व फळांच्या विविध जातींचे संशोधन होते. कृषी विद्यापिठातून आंब्यांच्या या जुन्या जातींचा शोध घेवून त्यांच्या पुनर्निर्मितीचा प्रयत्न करायला हवा, तरच या आंब्यांच्या जुन्या जातींचे जतन होईल.

जुन्या गावठी आंब्यांच्या जातींचे जतन व्हावे

अद्यापही काही गावांतून वरील वेगवेगळ्या जातीच्या आंब्यांची झाडे आढळतात. त्यांच्या पुनर्निर्माणासाठी कृषी विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे. मध्यंतरी सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात या जुन्या आंब्यांच्या झाडांच्या पुनर्निर्मितीचा प्रयत्न शासनाच्या कृषी विभागाने केला होता, नंतर त्याचे काय झाले हे त्यांनाच ठावूक….!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT