तळमावले; पुढारी वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील डुबलवाडी (खळे, शिद्रुकवाडी ग्रामपंचायत) येथे गणपती विसर्जनादिवशी तीन वर्षाच्या चिमुकल्याचा खड्ड्यातील पाण्यात पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे डुबलवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार डुबलवाडी येथे शुक्रवार, 9 सप्टेंबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास देवांश प्रमोद डुबल (वय 3) या चिमुकल्याचा घराच्या पाठीमागे असणार्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तत्पूर्वी त्याला उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घरातील गणपती विसर्जन करण्यासाठी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी देवांश गावाच्या वेशीपर्यंत आला होता. घरातील काही सदस्य गणपती विसर्जन करण्यासाठी नदीला गेले होते आणि विसर्जन करून ते घरी आले, तेव्हा त्यांना देवांश गणपती बाप्पाबद्दल विचारु लागला. मात्र पुढील काही तासात घरावर दु:खाचा डोंगर कोसळणार आहे ? याचा कोणी विचारही केला नव्हता.
गणपती विसर्जनानंतर काही वेळाने देवांश घरामध्ये नाही असे लक्षात आल्यानंतर घरातील सदस्यांनी शेजारी आसपास त्याची विचारपूस केली. तो वाडीमध्ये गेला असेल म्हणून त्याचा शोध घेतला. मात्र तो त्या ठिकाणी आढळला नाही. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर काही वेळानंतर घराच्या पाठीमागे असणार्या शोषखड्ड्यात देवांश पडल्याचे निदर्शनास आले. अंदाजे पाच फुट खोल असणार्या शोषखड्ड्यात पडल्यामुळे त्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. खेळतखेळत देवांश त्या खड्ड्यात पडला असावा, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. ही घटना समजताच विभागातील नागरिकांनी डुबलवाडीमध्ये धाव घेतली. देवांशच्या पश्चात आई वडिलांसह दोन मोठ्या बहिणी, आजी – आजोबा असा परिवार आहे