सातारा

सातारा : कॉलेजजवळच पहिला स्फोट झाला

Shambhuraj Pachindre

कराड : पुढारी वृत्तसेवा

'आमच्या कॉलेजच्या इमारतीपासून काही अंतरावरच पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे आम्ही घाबरून गेलो. आम्ही तात्काळ आमच्या होस्टेलवर गेलो. मात्र होस्टेल मॅनेजमेंटने आमची व्यवस्था होस्टेलच्या खाली शेल्टरमध्ये केली होती. तीन दिवस आम्ही सर्व विद्यार्थी शेल्टरमध्ये राहिलो. सातत्याने बॉम्बस्फोट झाल्याचे व फायरिंगचे आवाज येत होते. रशियन सैन्य सायरन वाजवत सतत शहरामधून फिरत होते. आम्ही अक्षरश: प्रचंड घाबरलो होतो. मात्र याठिकाणाहून बाहेर पडून भारतात जायचेच, असा आम्ही निर्धार केला होता'.

युक्रेनच्या कीव्ह शहरात मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या व मजल दरमजल करत शुक्रवारी भारतात परतलेल्या कराड येथील प्रतिक्षा अरबुणे हिने रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला किती भयावह आहे ? याचे कथन दै. 'पुढारी'शी बोलताना केले आहे. भारतातील 500 हून अधिक विद्यार्थी कीव्ह येथे मेडिकलचे शिक्षण घेत आहेत. प्रतिक्षा अरबुणे हिच्यासोबत सुमारे 200 विद्यार्थी भारतात येण्यासाठी धडपडत होते. प्रतिक्षा म्हणाली, 24 फेब्रुवारीला पहिला स्फोट कीव्हमध्ये झाल्यानंतर लगेचच सर्व विद्यार्थी होस्टेलवर गेले. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने होस्टेल मॅनेजमेंटने विद्यार्थ्यांना शेल्टरमध्ये ठेवले.

मात्र त्यावेळी खाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांनी स्वत:च करा, असे सांगितले. त्यामुळे दिवसभरात ज्यावेळी सुरक्षित वातावरण वाटेल, त्यावेळी आम्ही मार्केटमध्ये जावून खाण्याचे पदार्थ आणत होतो. बाहेरील वातावरणाचा अंदाज घेत आम्ही टॅक्सीने इबानो फ्रॅन्सिस्को येथील मेडिकल कॉलेजमध्ये गेलो. त्या कॉलेजच्या डिनने आम्हाला बॉर्डरपर्यंत जाण्यासाठी रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी बसची व्यवस्था करून दिली.

त्यानंतर ट्रेनने ज्या ठिकाणी आम्हाला सोडले, त्या ठिकाणाहून बॉर्डरपर्यंत 8 तास आम्हाला चालावे लागले. त्यानंतर आम्हाला भारतीय हवाई दलाच्या विमानातून दिल्लीत आणले गले. सध्या आम्ही दिल्ली येथे महाराष्ट्र सदनमध्ये आहोत. शनिवारी दुपारी कराडमध्ये पोहोचणार असल्याचेही प्रतिक्षा अरबुणे हिने सांगितले आहे.

प्रचंड थंडीत बॉर्डर गाठले

कीव्हमधून बाहेर पडण्यासाठी रेल्वेची व्यवस्था होती. त्यानंतर हुडहुडी आणणार्‍या थंडीत 8 तास चालत रोमानिया सीमेपर्यंत पायी प्रवास केला. त्या ठिकाणच्या नागरिकांनी आम्हाला खूप सहकार्य केले. आमच्यासाठी ब्लँकेटची सोय केली. आम्ही सर्व विद्यार्थी ग्रुप करून एकत्रित एकमेकांना धीर देत बॉर्डर गाठली, असे प्रतिक्षा अरबुणे हिने सांगितले.

SCROLL FOR NEXT