सातारा; पुढारी वृत्तसेवा ; जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लॉटरी पद्धतीने निश्चित केलेल्या लाभार्थी अर्जाच्या ज्येष्ठताक्रमाच्या यादीस जिल्हा परिषद ठराव समितीने मान्यता दिली आहे. विविध योजनांसाठी 5 हजार 479 अर्ज आले होते. त्यातून 2 हजार 513 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, सभेत विषय पत्रिकेवरील विषयांसह ऐनवेळच्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
सातारा जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या सभेत विषय पत्रिकेवरील सात आणि ऐनवेळच्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
कृषी विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने राबवण्यात येत आहेत. कडबाकुट्टी यंत्र, ताडपत्री, बॅटरी कम हॅण्ड ऑपरेटेड स्प्रेपंप, सायकल कोळपे, 7.5/5 एचपी विद्युत पंपसंच, 3 एचपी विद्युत पंपसंच, 5/4 एचपी डिझेल इंजिन, पीव्हीसी/ एचडीपीई पाईप, रोटाव्हेटर व कृषी यांत्रिकीकरण आदी योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांसाठी 2 हजार 513 जणांची निवड करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात 5 हजार 479 अर्ज दाखल झाल्याने लॉटरी पध्दतीने लाभार्थी निवड झाली. यामध्ये खंडाळ्यातील 117, कोरेगाव 186, खटाव 247, सातारा 426, माण 216, महाबळेश्वर 53, फलटण 223, कराड 401, पाटण 318, जावली 143 आणि वाई तालुक्यातील 180 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी विजयकुमार माईनकर यांनी दिली.