सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याने सूक्ष्म आणि लघू उद्योजकांची स्वतःला सावरण्याची धडपड व्यर्थ ठरत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित यंत्र सामग्रीसाठी लागणारी मोठी गुंतवणूक सूक्ष्म आणि लघू उद्योगांना न पेलणारी आहे. कामातील अनिश्चिततेमुळे काही उद्योगांमध्ये काम असते तेव्हा कामगार नसतात आणि कामगार असतात तेव्हा काम नसते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वतः काम करूनही आर्थिक घडी अधिकच विस्कळीत होत असल्याने हे उद्योजक आर्थिक चक्रव्यूहात सापडले आहेत.
जिल्ह्यात सातारा, खंडाळा, शिरवळ, लोणंद, वाई, फलटण, कराड याठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. कुशल मनुष्यबळाच्या सहकार्यातून गुणवत्तापुर्ण निर्मिती आणि वेळेत पुरवठा हे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचे मॉडेल राहिले. बदलेल्या औद्योगिक धोरणात ऑटोमायझेशनमुळे कुशल आणि अकुशल एकाच मेजरमेंटवर आले. पूर्वीचा कुशल कामगार दोन चार मशिन घेऊन उद्योजकांच्या पंक्तीत आला. येथूनच सूक्ष्म-लघू उद्योग आणि मध्यम – मोठे उद्योग यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले. या प्रवासात सूक्ष्म – लघू उद्योगाने महिनाच्या शेवटी किती मिळवायचे हे मध्यम-मोठे उद्योग ठरवत आहेत. अवजड व्यावसायिक वाहन उद्योगासाठी लागणार्या विविध स्पेअर पार्ट निर्मितीमध्ये देशात सातारा जिल्ह्याची महत्त्वाची भूमिका आहे. वाढत्या उत्पादन क्षमतेला पुरेसे कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याने उद्योग अडचणीत येत आहेत. लेबर चार्जेसवर काम करणार्या सूक्ष्म आणि लघू उद्योगात समाविष्ट उपठेकेदारांची संख्या सर्वाधिक आहे.
मध्यम आणि मोठ्या उद्योगात सर्व सेवा सुविधा व चांगले वेतन मिळत असल्याने स्थानिक कुशल मनुष्यबळ तेथे गुंतले आहे. परिणामी सूक्ष्म आणि लघू उद्योगाला ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षित करून काम करून घ्यावे लागते. हे तरुणही सहा महिने ते वर्षभर अनुभवानंतर मध्यम व मोठ्या उद्योगात संधी मिळताच काम बदलतात. 90 टक्के सूक्ष्म उद्योगात स्वतः मालक काम करतात. अशा परिस्थितीत वेळेत गुणवत्तापूर्ण पुरवठा देऊ शकत नसल्याने अनेकांना काम टिकवणेही अवघड बनले आहे.
लेथ मशिन हे इंजिनिअरिंग उद्योगातील मातृ मशिन म्हणून ओळखले जाते. पण कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि कामातील त्रुटी टाळण्यासाठी लेथऐवजी सीएनसी, व्हीएमसी व एचएमसी यासारखी अत्याधुनिक यंत्रे आली. त्यामुळे लेथ आणि टर्नर कालबाह्य झाले. सीएनसी, व्हीएमसी व एचएमसी मशिनवर काम करण्यासाठी किमान वेतनावर कुशल ऑपरेटर मिळत नसल्याने अनेक मशिनरींची शिफ्ट बंद राहत आहे. मोठ्या उद्योगांनी यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान स्वीकारले आहे. पण त्यालाही स्वतःच्या काही मर्यादा आहेत आणि सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाला सध्यातरी हे तंत्रज्ञान परवडणारे नाही.
मनुष्यबळाचा अभाव, न परवडणारे वीज दर, गरज नसताना कर्ज काढून भरावी लागणारी जीएसटी रक्कम, थकीत कर्जासाठी बँका व फायनान्स कंपन्यांचा तगादा, वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि मोठ्या कंपन्यांकडून लहान उद्योगांची सुरू असणारी पिळवणूक अशा विविध आव्हानांचा सामना करत सुरू असणारी सूक्ष्म व लघु उद्योगाची वाटचाल अतिशय धोकादायक वळणार आहे.