सातारा

सातारा : कांदाटीच्या उरावर रोजचेच मरण

अमृता चौगुले

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोर्‍यातील शिंदी, वलवण, चकदेव, आरव, पर्वत, मोरणी, म्हाळुंगे, उचाट, सालोशी, कांदाट, बन, वाघावळे, लामज, निवळी, आकल्पे, पिंपरी ही 16 गावे. आभाळाबरोबर डोंगरही कोसळल्याने दु:खाचा महापूर या 16 गावांमध्ये वाहताना दिसतोय.

शेतकर्‍यांच्या पिकवलेल्या जमिनींवर पूर, तुटलेल्या पुलांमध्ये पूर, तयार केलेल्या नव्या सडकांवर पूर, फाटक्या घरात उसळलेला पूर आणि या सार्‍यांचा मिलाफ होऊन डोळ्यात उसळलेला वेदनेचा महापूर कांदाटीतल्या 16 गावांमध्ये दिसतोय. कांदाटी खोर्‍याचे हे 'अरण्यरुदन' सातारा जिल्ह्यातल्या एका दुर्गम भागाची करुण कहाणी आहे. महाराष्ट्रात असंही एक खोरं आहे जिथं माणसं राहतात; पण रोज मरण उरावर घेऊन. हे अरण्यरुदन ऐकायला जायला भलेभले टरकतात, त्या दुर्गम निबीड अरण्यात जायला घाबरतात; मात्र तिथे 'पुढारी' पोहोचला थेट कांदाटी खोर्‍यात…!

संपर्कापासून कित्येक मैल दूर असलेला हा महाप्रदेश. अवघी 1500 ते 2000 एवढी लोकवस्ती. घनदाट झाडी, जंगली श्वापदांचा वावर, जनसुविधांचा हरताळ, मूलभूत सुविधांची कमालीची वानवा, वर्षानुवर्षे आपत्ती झेलत, निसर्गाच्या प्रकोपाशी दोन हात करत कशी बशी जगणारी इथली भाबडी जनता 22 व 23 जुलैच्या महाप्रलयात पूरती भेदरून गेली.

आभाळच नव्हे तर डोंगरही कोसळले. भातशेती उद्ध्वस्त झाली. गुरे, जनावरे वाहून गेली. त्यांचे लटकलेले मृतदेह पिकवलेल्या शेताच्या झाडावरच शेतकर्‍यांना पहायला मिळाले. आधीच उद्ध्वस्त झालेली माणसं निसर्गाच्या महाप्रलयकारी प्रकोपाने आणखी उद्ध्वस्त झाली. जमिनीने जशी जागा सोडली तशीच त्यांची मनेही खचून गेली आहेत. आताशी कुठे तिथे कव्हरेज पोहोचत होते तिथेच पुन्हा भयानक घडले आहे. होत्याचे नव्हते झाले आहे.

महाराष्ट्रापासून जणू काही कोसो दूर असलेल्या, संपर्कापासून वंचित असलेल्या कांदाटीचा हा हंबरडा महाराष्ट्रा तुला ऐकूण घ्यावा लागेल. हा आपल्या नकाशावरचा प्रदेश आहे याची जाणीव ठेवून सर्वच यंत्रणांनी या प्रदेशाच्या पुनर्उभारणीसाठी कांदाटीकडे मदतीचा महापूर पाठवला पाहिजे. कांदाटीचे हे अरण्यरूदन ऐका, डोळे फाडून पाहा, काळजात जर माणुसकीचा झरा असेल तर तिथेही माणसे राहतात याची जाणीव ठेवून त्यांच्यासाठी एक धाव घ्या, कांदाटीला वाचवा…!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT