सातारा

सातारा : ऐन पावसाळ्यात 16 गावे, 39 वाड्यात पाणी टंचाई

Shambhuraj Pachindre

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर, पुर्वेकडे पावसाने पाठ फिरवली आहे. असे असतानाही ऐन पावसाळ्यात माण, वाई, पाटण, जावली, सातारा व कराड तालुक्यातील 16 गावे व 39 वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे.

सुमारे 20 हजार 845 नागरिक व 7 हजार 63 जनावरांची तहान 12 टँकरवर अवलंबून आहे. सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून काही गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ऐन पावसाळ्यातही टँकर सुरू आहेत.सध्या पश्‍चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पूर्वेकडे मात्र पावसाने ओढ दिली आहे. ऐन पावसाळ्यात तरी टँकर बंद होतील अशी आशा प्रशासनाला होती. मात्र, पावसाळा सुरू झाला असला तरी बहुतांश ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत.

माण तालुक्यातील पाचवड, पांगरी, बिजवडी, वडगाव, वारुगड या 5 गावांसह 28 वाड्या वस्त्यांमधील 7 हजार 308 नागरिकांना 4 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव, गडगेवाडी, बालेघर अंतर्गत अनपटवाडी, कासुर्डेवाडी, गुंजेवाडी, ओहळी या गावांसह 2 वाड्यामधील 5 हजार 381 नागरिकांना व 3 हजार 262 जनावरांना 2 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाटण तालुक्यातील जंगलवाडी, जाधववाडी, चव्हाणवाडी, फडतरवाडी, घोट, आंब्रुळकरवाडी, भोसगाव या वाड्या मधील 1 हजार 759 नागरिकांना व 843 जनावरांना एका टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

जावली तालुक्यातील गवडीमधील 2 हजार 532 नागरिकांना व 1 हजार 102 जनावरांना 2 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सातारा तालुक्यातील जांभगाव व आवाडवाडी येथील 1 हजार 490 नागरिकांना व 340 जनावरांना 2 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कराड तालुक्यातील वानरवाडी, बामनवाडी, जंगलवाडी येथील 2 हजार 375 नागरिक व 1 हजार 516 जनावरांना 2 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.पाणी भरण्यासाठी सुमारे 20 विहिरी व 16 विंधन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT