सातारा

सातारा : उत्तर कोरेगावातील बेरोजगारी संपणार कधी?

मोनिका क्षीरसागर

पिंपोडे बुद्रुक (सातारा) : कमलाकर खराडे
कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. गेल्या दोन-तीन वर्षांचा पिण्याच्या पाण्याचा अपवाद वगळता येथील संपूर्ण शेती पाण्यासाठी कायम आसुसलेली असते. शेतीला पाणी नसल्याने अनेक युवकांच्या हाताला काम नाही. या भागात बेरोजगारीची समस्या आ वासून उभी आहे. ही बेरोजगाराची समस्या संपणार कधी? असा सवाल उपस्थित होत आहे. अनेक पिढ्या हे चित्र असून ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस धोरणांची कृतीयुक्‍त अंमलबजावणी गरजेची आहे.

उत्तर कोरेगाव तालुक्यातील एक संपूर्ण पिढीच दुष्काळाने गिळंकृत केली आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी इथल्या जनतेचा कामापुरता वापर केला आहे. तरीही जनतेने त्यांच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले आहे. मुठभर स्वार्थी गाव टग्यांनी गावच्या गावं नेत्यांच्या दावणीला बांधल्याने इथली शेती पाण्याची आणि बेरोजगारीची समस्या आजही आ वासून उभीच आहे. शेतकरी सधन झाला तर आपल्या सत्ता साम्राज्याला सुरुंग लावू शकतो. या अनामिक भीतीने व राजकारणापायी जनतेला मात्र मरणाच्या दारात उभं करण्याचं महापाप सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात आले आहे.

पिढ्यान्पिढ्या येथील तरुण वर्ग नोकरीच्या शोधात पुणे, मुंबईसारख्या शहराचा रस्ता धरत आहे. आजही इथला तरुण नोकरीसाठी भटकंती करतोय तर आज ना उद्या शेतीला पाणी मिळेल या आशेवर येथील शेतकरी आजही कसाबसा जगतोय. वसना उपसा सिंचन योजनेच्या नावाखाली 25 वर्षांहून अधिक काळ राजकारण सुरू आहे. आजवर पार पडलेल्या सर्व निवडणुकांमध्ये आश्‍वासनांचा पाऊस पडला. पण, त्यावर कोणतीच कार्यवाही कोणीही आमदार किंवा खासदारांनी केलेली नाही. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीपासून उत्तर कोरेगाव तालुक्यातील 26 गावे फलटण विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. आता तरी आपले हाल संपतील, अशी आशा जनतेला होती. मात्र, तीसुद्धा फोल ठरली आहे.

शेतीचा खरीप हंगाम आता जवळ आला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. छोटे-मोठे ओढे- नाले आटले आहेत, विहिरी, कुपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. ही परिस्थिती केवळ पावसावर शेती अवलंबून असल्याने झाली. हेच जर शेत शिवारात पाणी असते तर शेतकरी नक्‍कीच सुखी झाला असता. हे असं चक्र आणखी किती दिवस, किती वर्षे सुरू राहणार? याचे उत्तर येणारा काळच देऊ शकतो.

टग्यांकडून कवडीमोल भावात जमीन खरेदी

सहा महिन्यांपूर्वी येथे छोटी औद्योगिक वसाहत उभी करता येईल का? यासाठी काही लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी नांदवळ आणि भावेनगर येथील जागेची पाहणी केली. जनतेत केवळ आपल्या भागात काही तरी होणार? याची चर्चा व्हावी म्हणून असं पिल्लू सोडून देण्याची नामी शक्‍कल आता नेते मंडळींनी शोधून काढली आहे. अशा होणार्‍या पाहणी दौर्‍यामुळे काही टगे मंडळी सर्वसामान्य लोकांच्या शेतजमिनी कवडीमोल किमतीने विकत घेत असल्याचे चित्र या भागात दिसू लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT