सातारा

सातारा : आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराची सांगता; साडे चार लाख मतदार बजावणार हक्क

मोहन कारंडे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 246 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. आरोप-प्रत्यारोपांनी सायंकाळी प्रचाराची सांगता झाली. या निवडणुकीत सरपंच आणि सदस्यपदाचे सुमारे 4 हजार 542 उमेदवार नशीब आजमावत असून सुमारे 4 लाख 43 हजार 481 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्ह्यात 319 ग्रामपंचातींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पार पडलेल्या माघार प्रक्रियेत 47 ग्रामपंचायती पूर्णत: तर 13 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या. मात्र, माघार प्रक्रियेनंतरही बर्‍याच ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी, तिरंगी लढती होत आहेत. 242 ग्रापंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 246 तर 246 ग्रापंचायतींमध्ये सदस्यपदासाठी 3 हजार 894 उमेदवार आमनेसामने आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांनी नेत्यांची झोप उडवली आहे. निवडणूकद़ृष्ट्या बरीच गावे सध्या संवेदनशील आहेत. वादाचे प्रसंग घडत आहेत. प्रचाराच्या निमित्ताने नेतेमंडळी गावे पिंजून काढू लागल्याने राजकीय गरमागरमी होवू लागली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधार्‍यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा पंचनामा विरोधक करत आहेत. तर गावचा सर्वांगिण विकास केल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. यामध्ये टोकाचा संघर्ष उफाळून आला आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी छुप्या प्रचाराला वेग आला आहे. राजकीय वाद उफाळून येणार नाहीत, याची काळजी जिल्हा प्रशासन घेत असून राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांवर लक्ष ठेवण्यात आले आहे.

या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. हा दिवस मतदारांचा असेल. पाच वर्षांतील यश-अपयशाचा विचार करुन मतदारराजा आपल्या मताचे दान कुणाच्या झोळीत टाकणार, याची उत्सुकता आहे. जिल्ह्यात निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींसाठी सुमारे 4 लाख 43 हजार 481 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 2 लाख 15 हजार 673 स्त्री व 2 लाख 27 हजार 805 पुरुष मतदारांचा व 3 इतर मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आवश्यक कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2, 3 या अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. मतदान यंत्रांची चाचणी घेतली आहे. मतदान यंत्रावरील मतदान पत्रिका छापल्या असून त्या मतदान यंत्रावर चिकटविल्या आहेत. शनिवारी सायंकाळी सर्व साहित्याचे वितरण संबंधित तहसीलदारांकडून मतदान अधिकार्‍यांना करण्यात येणार आहे. 259 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्याठिकाणी 927 मतदान केंद्रे आहेत. सर्वाधिक 219 केंद्रे पाटण तालुक्यात आहेत. या मतदानासाठी सुमारे 429 इमारती ताब्यात घेतल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT