सातारा

सातारा: आमची निष्ठा पवारांसोबत; तेजस शिंदे

मोनिका क्षीरसागर

कुडाळ; प्रसन्‍न पवार: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे यांचे पुतणे, ऋषिभाई शिंदे यांचे चिरंजीव सौरभदादा शिंदे यांनी एका प्रकल्पाच्या कामावरुन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिंदे घराण्यात फूट पडल्याचे चित्र निर्माण केल्यावरुन वाद पेटला आहे. दस्तुरखुद्द सौरभ शिंदे व तेजस शिंदे या दोन्ही भावांनी या संदर्भात 'पुढारी'शी बोलताना स्पष्टीकरण दिल्याने शशिकांत शिंदे यांच्या घरात कोणतीही फूट पडली नसल्याचे समोर आले आहे.

शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे आमची ओळख झाली असून त्यांना कधीही न विसरण्याचा धर्म आम्ही आजपर्यंत पाळला आहे. यापुढेही नक्कीच पाळत राहू. आमचे कुटुंब कायम राष्ट्रवादी व शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण आ. शशिकांत शिंदे यांचे सुपुत्र व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी दिले आहे. सौरभ शिंदे यांचे स्टेटमेंट काहींनी चुकीच्या पद्धतीने दाखवल्यामुळे आमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाल्याचेही तेजस शिंदे यांनी सांगितले.

आ. शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ (दादा) शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले की, काही वेब पोर्टल व वाहिन्यांनी सौरभ शिंदे यांचे चुकीचे स्टेटमेंट दाखवले आहे. ते पाहून आम्हा कुटुंबाला दुःख झाले. कुटुंबाला कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शरद पवार यांच्यामुळे राजकीय ओळख निर्माण झाली. त्यांनी दिलेल्या राजकीय संधीने महाराष्ट्राच्या राजकारणात आ.शशिकांत शिंदे हे सक्रिय झाले. सर्व कुटुंबाची ओळख ही शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे झाली आहे. परंतु आमच्याच कुटुंबातील एका व्यक्तीचे स्टेटमेंट घेऊन शिंदे साहेबांच्या पक्षनिष्ठेला तडा जात असेल तर याचा विचार करणे काळाची गरज आहे.

कुटुंबातील कोणाशी चर्चा न करता वाहिन्यांवर, वेबपोर्टलवर अशा प्रकारचे चुकीचे स्टेटमेंट प्रसिध्द केले गेले. कोणत्याही परिणामाचा विचार न करता हा चुकीचा निर्णय परस्पर घेतला गेला हे कितपत योग्य आहे. अशा प्रकारचे चुकीचे स्टेटमेंट देत असताना त्याचे राजकीय परिणाम काय होतील याचा विचार करणे आवश्यक होते पण दुर्दैवाने तसे झाले नाही. आमची निष्ठा शरद पवार यांच्यांशी व राष्ट्रवादीशी कायम आहे आणि ती सदैव राहील. या संदर्भात कुठेही संघर्ष करावा लागला तरी आम्ही तडजोड करणार नसल्याचे तेजस शिंदे यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT