सातारा

सातारा : आप्पा मांढरे फायरिंग प्रकरण : फायरिंग करणारे मुख्य संशयित जेरबंद; दोघांना अटक

मोहन कारंडे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यातील राजवाडा परिसरात आप्पा मांढरे यांच्यावर फायरिंग केल्याप्रकरणी मुख्य दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेनंतर पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले आहेत. ऋषभ राजेंद्र जाधव (वय 25, रा. रविवार पेठ, सातारा), चंद्रकुमार मारुती निगडे (वय 25, रा. पाटखळमाथा, ता. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. यातील ऋषभ जाधव हा सूत्रधार असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

याबाबत अधिक महिती अशी, 9 नोव्हेंबर रोजी रात्री राजवाडा येथील गोलबागेजवळ आप्पा मांढरे (रा. मांढरे आळी, सातारा) यांच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. वर्दळीच्या ठिकाणी सायंकाळी घडलेल्या या घटनेने सातारा हादरुन गेला होता. गंभीर जखमी झालेल्या मांढरे यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरुवातीला काही जणांची धरपकड करण्यात आली. मात्र त्यामध्ये एक सज्ञान तर दोन अल्पवयीन मुले निघाली. पोलिस तपासामध्ये मुख्य संशयित आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली मात्र त्यांना पकडण्यात सातारा पोलिसांना यश येत नव्हते.

पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केल्यानंतर संशयित आरोपी पुणे येथे असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार पुणे, हांडेवाडी, हडपसर येथे शोध मोहीम राबवत मुख्य सुत्रधारास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. पोलिस तपासामध्ये मुख्य सुत्रधार संशयितासह इतर साथीदारांनी मांढरे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे व कट तडीस नेण्यासाठी अल्पवयीन बालकांचा वापर करुन त्यांच्याकरवी गोळीबार घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, एलसीबीचे पोनि अरुण देवकर, पोनि संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

2017 सालच्या खुनाची किनार…

सन 2017 मध्ये मंगळवार तळे परिसरात अक्षय वाघमळे या युवकाचा खून झाला होता व तो फायरिंग प्रकरणातील संशयित आरोपींचा मित्र होता. या घटनेतून फायरिंग केल्याचेही समोर येत आहे. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जीवे मारण्याचा कट रचल्याची माहिती मुख्य सूत्रधार व त्याच्या साथीदारांनी दिली आहे. दरम्यान, संशयितांनी वापरलेले पिस्टल व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT