मेढा; पुढारी वृत्तसेवा : जावलीकरांनी विचार करावा, अशा आशयाचे बॅनर मेढा बाजार चौकात लावले आहे. दारूबंदीचा फज्जा उडवत आडवी बाटली पुन्हा उभी करण्यासाठी मेढा ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांची येथील भैरवनाथ मंदिरात रविवारी सायंकाळी 4 वा. बैठक आयाजित केली आहे.
जावली तालुका दारूमुक्त झाला ही खरोखरच आनंदाची बाब आहे. त्यासाठी व्यसनमुक्ती संघटनेबरोबर आपण सर्वांनी मेहनत घेतली. लोकांची व्यसनं सुटतील, माता भगिनींचे संसार फुलतील, तरुणाई व्यसनापासून दूर राहील, असा त्यामागे उदात्त हेतू होता. मात्र, झाले उलटेच. आज सर्व तालुक्याचे चित्र पाहिले तर काय अवस्था आहे? गावोगावी अवैध दारूधंदे सुरू झालेत. त्यातून अनेक मान्यवरांना इन्कम सुरू झालाय. तरुण पोरं दारू विकत आहेत, दारू मिळत नाही म्हणून उलट चार चार बाटल्या खरेदी केल्या जात आहेत. एकदा दारू तोंडाला लागली की मग त्या चारही बाटल्यांचा फडशा पाडला जाऊन नको ते प्रकार घडत आहेत.
या अवैध दारू विक्रीतून मोठी आर्थिक लॉबी तयार झाली आहे. दारू विकणारे आणि दारूधंद्याला अभय देणारे मालामाल झालेत. अवैध दारूतून मिळणार्या पैशाने मस्ती वाढली आहे. कारवाईचा केवळ फार्स केला जातोय, अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. ज्या मंडळींनी दारूबंदी करण्यासाठी उठाव केला त्यांच्या बाजूने मात्र कोणीही प्रतिक्रिया देताना दिसत नाही.
उलट दारूबंदीमुळे तालुक्याचं मार्केट बसलं, लोकांचे धंदे होईनात, मार्केटमध्ये उलाढाल थांबलीय, पर्यटक दारू मिळत नाही म्हणून येथे थांबायला तयार नाहीत. याचा बाजारपेठेवर परिणाम होत आहे. पण, ती बंद करायची असेल तर तालुक्यात दारूचा एक थेंब पण मिळाला नाही पाहिजे. तरच दारूबंदीचा फायदा होईल; अन्यथा विनाकारण बाजारपेठेवर परिणाम का करून घ्यायचा? अवैध दारु विक्री करणार्यांना मोठं करायचं, हप्तेबाजीला खतपाणी घालायची गरज नाही. यामुळे व्यापारी व नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, पर्यटनालाही खीळ बसत आहे. हे सर्वांना कळत आहे. मात्र, भीतीने कोणीच बोलत नाही.
पण आता गप्प बसणे सयुक्तिक ठरणार नाही. उठाव केलाच पाहिजे. दारू कायदेशीर मार्गाने सुरू करण्यासाठी एकत्र येऊन आवाज उठवलाच पाहिजे, असे या बॅनरवर लिहिले आहे. आता दारू सुरू व्हावी, या मागणीसाठी कितीजण पुढाकार घेतात? हे रविवारच्या बैठकीत स्पष्ट होईल.