बंधार्‍यात मूकबधिर मुलगा बुडाला 
सातारा

सातारा : आईदेखत बंधार्‍यात मूकबधिर मुलगा बुडाला

पुढारी वृत्तसेवा

म्हसवड : माण तालुक्यातील म्हसवड येथील शेंबडेवस्ती येथे आईसोबत शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेला मूकबधिर विद्यार्थी बुडाला. माणगंगा नदीवरील बंधार्‍यात ही घटना घडली. पोटचा गोळा डोळ्यादेखत बुडत असताना मूकबधिर मातेला कुणाला मदतीलाही बोलावता आले नाही. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही या मुलाचा थांगपत्ता लागला नाही. या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. हणमंत मोहन शेंबडे (वय 18, रा. शेंबडेवस्ती, म्हसवड) असे बुडालेल्या मूकबधिर विद्यार्थ्यांचे नाव आहे.

हणमंत हा मुकबधिर विद्यार्थी इयत्ता दहावीच्या वर्गात सातारा येथील मुकबधीर विद्यालयात शिक्षण घेत आहे. गणेशोत्सवामुळे तीन- चार दिवस सुट्टी असल्याने तो गावी झाला होता. रविवार दि.15 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता हणमंत शेंबडे हा आईसोबत शेतात मोटार चालू करण्यासाठी गेला होता. हणमंतची आईसुद्धा मुकबधिर आहे. कासर्‍याच्या सहाय्याने नदी पार करून त्यांना शेतात जावे लागते. आई नदीच्या काठावर असताना हणमंत कासर्‍याच्या सहाय्याने पलिकडे निघाला होता. यादरम्यान कासरा हातातून निसटल्याने तो पाण्यात पडला अन् वाहून गेला. यावेळी मुकबधीर असल्याने मदतीसाठी माऊलीला साधे ओरडतासुध्दा आले नाही. मुलगा पाण्यात वाहत गेल्याचे त्या आईने घरी पळत जाऊन वडील मोहन शेंबडे व इतरांना सांगितले. ही वार्ता वार्‍यासारखी पसरली. म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस, म्हसवड नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत तरी हणमंत शेंबडे याचा शोध लागला नव्हता.

या घटनेची माहिती मिळताच आ. जयकुमार गोरे, दहिवडी उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास आहिर व म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार, आप्पासाहेब पुकळे, सर्कल, तलाठी पोलिस कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

कासरा हातातून निसटला अन् ...

माणगंगा नदी सध्या पूर्ण क्षमतेने वाहत आहे. त्यामुळे कासर्‍याच्या साहाय्यानेनदीपार करून शेतात जावे लागत आहे. हणमंत शेंबडेसुद्धा आईला नदीच्या काठावर उभा करून कासर्‍याच्या साहाय्याने नदीपार करत होता. मात्र, नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर हणमंत शेंबडे याच्या हातातून कासरा निसटला आणि तो पाण्यात वाहत गेला. मूकबधिर आईच्या समोरच मुलगा वाहून गेला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT