सातारा

वासोटा पर्यटन आजपासून बहरणार; कोरोना नियमांसह लसींचे डोस प्रमाणपत्र सक्तीचे

Shambhuraj Pachindre

बामणोली : पुढारी वृत्तसेवा

जावली तालुक्याच्या पश्चिमेला असणार्‍या बामणोली व परिसरातील पर्यटनाला आता चालना मिळणार असून, ओमायक्रॉन संकटामुळे बंद असलेले किल्ले वासोटा पर्यटन गुरुवार, दि.3 फेब्रुवारीपासून पूर्ववत सुरू होणार असून, वासोटा आणि इतर पर्यटनस्थळांनाही आता बहर येणार आहे.

किल्ले वासोटा पर्यटन पूर्ववत सुरू होत असल्याने बामणोली परिसरात आनंदाचे वातावरण आहे. किल्ले वासोटा हा महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या ट्रेकर्स व पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतो. दि. 10 जानेवारीपासून बंद असलेले किल्ले वासोटा पर्यटन गुरुवार दि. 3 पासून सुरू होत असल्याची माहिती बामणोली वनक्षेत्रपाल बी. डी. हसबनीस यांनी दिली. मात्र, किल्ले वासोटा पर्यटनस्थळी येणार्‍या ट्रेकर्स, पर्यटकांना कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. शासनाने घालून दिलेले कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.

किल्ले वासोट्यावर पन्नास टक्केच पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. किल्ले वासोटा या पर्यटन स्थळासह स्वयंभू तीर्थक्षेत्र नागेश्वर, चकदेव पर्वत ही पर्यटन स्थळेदेखील खुली करण्यात आली आहेत. पर्यटकांनी पर्यटनास गेल्यावर शासकीय नियमांचे पालन करणे जरूरीचे आहे. तशा अटी शासनानेही घातलेल्या आहेत.

परिसरातील लोकांना रोजगार…

किल्ले वासोटा पर्यटन स्थळ सुरू झाल्याने बामणोली, तापोळा, शेंबडी, मुनावळे परिसरातील बोटचालक, हॉटेल, टेन्ट व्यावसायिक यांना पुन्हा रोजगार उपलब्ध होणार आहे. या परिसरातील लोकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

SCROLL FOR NEXT