वाई; पुढारी वृत्तसेवा : वाई-जांभळी रस्त्यावर धोम गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होवून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना सोमवारी दुपारी घडली. तानाजी नवलू शेलार (वय 32, रा. खावली, ता. वाई) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
वाईच्या पश्चिम भागातील रेणावळे या गावी ज्ञानदेव चंद्रकांत सणस (वय 24) हे आपल्या दुचाकीवरुन आजी आजोबांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून ते परतत असताना दुपारी त्यांची दुचाकी साडेचारच्या सुमारास धोम गावच्या हद्दीत आली. त्यावेळी समोरुन भरघाव वेगाने येणार्या दुचाकीने सणस यांच्या दुचाकीला धडक दिली. दोन्हीही दुचाकीस्वार गंभीर जखमी होवून बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडले. स्थानिकांनी जखमींना तातडीने वाईच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तानाजी शेलार यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक एस डी वाळुंज करीत आहेत.