सातारा

लंपी : मृत जनावरांच्या पशुपालकांना मिळणार अर्थसहाय्य

अनुराधा कोरवी

सातारा : पुढारी वृत्तसेवा :  गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य लंपी त्वचा रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी व पशुपालकांच्या मृत पावलेल्या पशुधनास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचा आदेश राज्याच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने काढला असून त्यासाठी जिल्हास्तरावर मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव राज्यातील 21 जिल्ह्यात झपाट्याने पसरला आहे. उद्भवलेल्या लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू आहेत. लंपी चर्मरोगाच्या प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी व पशुपालकांच्या पशुधनाचा मृत्यू झाला आहे अशा शेतकरी पशुपालकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील निकषाप्रमाणे 100 टक्के राज्य शासनाचे अर्थसहाय्य देण्याबाबत व त्याची अमंबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे आदेश मंत्रीमंडळाच्या बैठकीत देण्यात आले आहेत.

लंपी त्वचारोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांचा शेतकरी, पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखन्यावरील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस-पाटील, तसेच स्थानिक दोन नागरिकांच्या उपस्थितीत पंचनामा करुन घ्यावयाचा आहे. या पंचनाम्यात पशुधनाचा मृत्यू लंपीमुळे झाला असल्याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. समितीने पंचनाम्याच्या आधारे खातरजमा करुन संबंधित शेतकरी व पशुपालकांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी शिफारस करुन पंधरा दिवसाच्या आत संबंधित पशुपालकांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा करावी. दुधाळ जनावरे गाय व म्हैस प्रत्येकी 30 हजार रुपये (3 मोठी दुधाळ जनावरांसाठी), बैल 25 हजार रुपये (3 मोठी जनावरांपर्यंत), वासरे 16 हजार रुपये (6 लहान जनावरांसाठी) असे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

अशी राहणार समिती

जिल्हास्तरावरील समितीमध्ये जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी हे अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकार्‍यांनी
नामनिर्देशित केलेला उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जि. प. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय (संबंधित) हे सदस्य तर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

SCROLL FOR NEXT