सातारा

रयत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण देणार : शरद पवार

दिनेश चोरगे

कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा :  आज विविध क्षेत्रे काबीज करत, उच्च शिक्षण, संरक्षण आणि संशोधन अशा क्षेत्रात प्रगती करत रयतच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे. तर विद्यार्थ्यांनीही चमकदार कामगिरी करत सावित्रीबाईंचा वारसा सिद्ध केला आहे. भविष्याचे आव्हान पेलण्यासाठी रयत शिक्षण संस्था आता सज्ज झाली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या इन्फोसिस व आयबीएम यांच्याशी करार करून येत्या शैक्षणिक वर्षापासून रयतच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण व सेवा क्षेत्रातील संधी देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हा. चेअरमन भगीरथ शिंदे, संस्थेचे कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, संजीव पाटील, अ‍ॅड. रवींद्र पवार, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, राजेंद्र साळुंखे, शहाजी डोंगरे, राजेंद्र फाळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

खा. शरद पवार म्हणाले, कर्मवीर अण्णांनी सर्वसामान्यांच्या सहकार्यातून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. कर्मवीर अण्णांनंतर स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचे नेतृत्व मिळाल्याने संस्थेचा विस्तार झाला. परदेशात सैन्यदलामध्ये महिलांचा समावेश आहे. त्या धर्तीवर मी संरक्षण मंत्री असताना महिलांना 11 टक्के संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून आज लढाऊ विमानाचे नेतृत्व महिला करत आहेत. रयतच्या विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट आणि आयबीएम या कंपन्या ऑनलाईन व्यावसायिक प्रशिक्षण देणार आहे. यानंतर 80 टक्के विद्यार्थ्यांना या कंपन्या नोकरी देणार आहेत.

यावेळी खा. श्रीनिवास पाटील, डॉ. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य विजयसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले. देवानंद
सोनटक्के व प्रा. साधना पाटील यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, जनरल बॉडी सदस्य, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT