file photo 
सातारा

रयत कारखान्याची सत्ता कोणाकडे जाणार?

Shambhuraj Pachindre

उंडाळे : वैभव पाटील

माजी मंत्री स्व. विलासराव पाटील संस्थापक असलेल्या रयत सहकारी साखर कारखान्याची सत्ता माजी पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादीचे पदाधिकारी अ‍ॅड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील यांनी मिळवण्यासाठी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यांनी उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. मात्र स्व. उंडाळकर यांच्या पश्चात अ‍ॅड. उदयसिंह पाटील या कारखान्याचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे सभासदांची पसंती कारखाना वाचवणार्‍याला मिळणार की सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांना मिळणार याबाबत मतदार संघात उत्सुकता आहे.

माजी मंत्री स्व.विलासराव पाटील उंडाळकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मंत्रिपद व आमदारकी पणाला लावून रयत सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. ते या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष झाले. परंतु मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर कारखान्याची सूत्रे आपले ज्येष्ठ बंधू जयसिंगराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केली; परंतु जयसिंगराव पाटील यांना हा कारखाना फारसा चांगला चालवता आला नाही. अशी चर्चा आहे. त्यामुळे हा कारखाना बंद पडला. त्याच काळात विधानसभा निवडणुकीचा कालावधी असल्याने स्व. विलासराव पाटील यांना या कारखान्यातील शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. रयत साखर कारखाना बंद पडल्यानंतर या कारखान्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली. कोट्यवधी रुपयांची कर्जे कारखान्यावर झाली. बँकेच्या जप्ती नोटिसा निघाल्या.

राज्य सहकारी बँक हा कारखाना ताब्यात घेऊन विक्री लिलाव करण्याची तयारी चालू केली होती . परंतु, उंडाळकर यांच्या हुशारीने हे सर्व थांबून हा कारखाना त्यावेळी कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याला चालविण्यास देण्यात आला. पण, येथे आर्थिक व्यवहार न जुळल्याने हा करार मोडण्यात येऊन पुन्हा कारखाना कुमुदा शुगर व्यवस्थापनाकडे चालवण्यास देण्यात आला. या व्यवस्थापनाने ऊस गाळप केलेल्या शेतकर्‍यांचा एकही रुपयांना दिल्याने ऐन निवडणुकीच्या काळात हाच मुद्दा उंडाळकरांच्या विधानसभा निवडणुकीला कळीचा ठरला व त्यात त्यांचा पराभव झाला.

सध्या रयत कारखाना अथणी शुगर व्यवस्थापनाकडे चालवण्यास देण्यात आला. या व्यवस्थापनाने उंडाळकर यांच्या कारखान्याला अडचणीतून बाहेर काढणारे ठरले. आज रयत कारखान्याची कर्जमुक्ती झाली असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. रयत सहकारी साखर कारखाना हा सध्या उंडाळकर घराण्यात कळीचा मुद्दा झाला आहे. हा कारखान्यावर आता अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांना सत्ता हवी आहे. यासाठी त्यांच्या कारखाना कार्यक्षेत्रात भेटीगाठी व बैठका सुरू आहेत. रयत सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र कराड व पाटण तालुका असून बहुतांश सभासद हे कराड दक्षिण पाचवड फाट्या पासून वरती व पूर्वीच्या दक्षिण मतदारसंघातील पाटण तालुक्यातील गावात आहे.

त्यामुळे हा मतदारसंघ विलास काकांना मानणारा आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातील अपवाद वगळता बोटावर मोजण्या इतके सभासद कृष्णा काठावर आहेत. परंतु सर्वच सभासद हे डोंगरी भागातील असल्यामुळे आज पर्यंत या कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. रयत कारखान्याचे 184 गावात एकूण अकरा हजार सभासद आहेत त्यापैकी जवळजवळ तीन ते चार हजार मयत सभासद आहेत. उर्वरित सात ते साडेसात हजार सभासद हे मतदार यादीत आहेत. या सर्व सभासदांचे काकांच्या विचाराला पाठबळ राहिले होते.

उंडाळकर घराण्यात राजकीय वाद वाढावा यासाठी तालुका व जिल्हास्तरावरील राजकीय नेतेमंडळी कार्यरत असल्याची चर्चाही मतदारसंघात असून निवडणुकीसाठी आनंदराव पाटील यांना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील भाजप प्रदेश चिटणीस युवानेते डॉ. अतुल भोसले यांची साथ मिळणार असल्याचे खुद्द राजाभाऊ पाटील संपर्क दौर्‍यात सांगतात. त्यामुळे सहकार मंत्री व भाजपाचे डॉ. अतुल भोसले या निवडणुकीत उघडपणे सहभाग येणार की बाहेरून पाठिंबा देणार, याची ही चर्चा सध्या सुरू आहे.

कोणाकोणाची होणार मदत?

स्थापनेपासून रयत सहकारी साखर कारखान्याची ही पहिलीच निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीचे चित्र फार काही वेगळे असणार नाही. ही निवडणूक दोघा चुलत बंधूतच होईल त्यासाठी इतर राजकीय नेते पदाधिकारी राजाभाऊंना आतून की बाहेरून मदत करतील? की उघडपणे कोणीही येणार नाही? असे आजचे चित्र आहे. त्याचे कारण ही त्याच पद्धतीचे असल्याने स्वतःचा पत्ता कोणीही ओपन करणार नाही ही वस्तुस्थिती मतदार संघात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT