सातारा

महाराष्ट्र गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही : खा. संजय राऊत

अनुराधा कोरवी

सातारा : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे नाव, चिन्हं गेल्यामुळे शिवसेना संपली असणारे काहीजण म्हणतायत. पण आज शिवसेना रस्त्यावर पहातोय. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतायत. शिवसेनेची गर्जना करत गद्दारांच्या नावाने ठणठणा बोंबा मारत आहेत. खोकेवाल्या ४० आमदारांच्या बाजूने कागदावर निर्णय दिला पण निवडणूक आयोग या शिवसेनेचे काय करणार? हा महाराष्ट्र गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असे ठणकावत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट व निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.

साताऱ्यातील शाहू कला मंदिरात झालेल्या शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबूराव माने, जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते, जिल्हाध्यक्ष हर्षल कदम, हणमंत चवरे, अमोल आवळे उपस्थित होते.

खा. संजय राऊत म्हणाले, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. गर्दी, भक्ती, ऊर्जा, अग्निकुंड असलेल्या शिवसेनेचे आयोग काय करणार? ही शिवसेना शिंदे-मिंद्यांना कशी मिळणार? सकाळी आयोगाला कुठं शिवी दिली ते विसरलो. मी खरोखर शिवी दिली का? ज्याची जशी लायकी तशी भाषा वापरायची असते. तुमची शिव्या खायची लायकी असेल तर आम्हाला उत्तम शिव्या येतात. मी माफीबिफी मागणार नाही. 'पन्नास खोके एकदम ओके,' ही देशाची लोकप्रिय शिवी आहे. खा. राहूल गांधी यांच्याबरोबर जम्मू काश्मीरला गेलो. त्यांच्यासोबत चालत असताना किमान १० ठिकाणी या घोषणा ऐकायला मिळाल्या. राहूल गांधी यांनीही हे सांगितलं. या बेईमानांची अपकिर्ती देशाच्या सीमेपर्यंत पोहोचली असून त्यांनी महाराष्ट्र बदनाम करून टाकला.

खा. राऊत पुढे म्हणाले, क्रांती काय असते हे स्वातंत्र्यलढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या लढ्यात या ऐतिहासिक सातारा जिल्ह्याने दाखवून दिलं आहे. बलाढ्य कंपनी सरकारविरोधात समांतर सरकार चालवणारा हा जिल्हा आहे. अजिंक्यतारा किल्ल्यासारखीच शिवसेनेची अवस्था झाली आहे. अजिक्यताराने अनेक गद्दार पाहिले. असंख्य घाव या किल्ल्याने पाठीवर आणि पोटावरही झेलले.
यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबूराव माने, जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते व पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष हर्षल कदम, हणमंत चवरे, अमोल आवळे, संभाजी जगताप, संजय भोसले आदि पदाधिकारी उपस्थित होते.

ते पाटणचं कोण?… पापाचं पितर…

खा. राऊत म्हणाले, ते पाटणचं कोण? पापाचं पितर कोण रे? शंभू की चंबू? अरे शिवसेना नसती तर तुमच्या घराण्याला मंत्रिपद मिळालं असतं का? ३७ वर्षांनी तुम्हाला मंत्रिपद मिळालं. बाळासाहेब देसाई हे मोठं नाव राज्याच्या राजकारणात होवून गेलं. त्यांनी राज्याचे नेतृत्व केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बाळासाहेब देसाई होते. मराठी माणसाचा स्वाभिमान वाढावा यासाठी शिवसेनेला त्यांनी त्यावेळी ताकद दिली. बाळासाहेब देसाई, वसंतराव पाटील, यशवंतराव चव्हाण अशा या भागातील नेत्यांनी शिवसेनेला साथ दिली; पण ही कालची कार्टी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. शिवसेना संपवायला तुमचे बाप आले पाहिजेत.

सातारचे आमदार हिंदुत्ववादी कधी झाले?

खा. राऊत म्हणाले, सातारच्या आमदारांविषयी पदाधिकारी सांगत होते. सातारचे भाजपचे आमदार कधी झाले हिंदुत्ववादी? तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात याचा आम्हाला आदर आहे. पण तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाला अजिबात अभिमान व आदर नाही. छत्रपती पेशव्यांना नेमत होते आता पंत नेमणुका करायला लागले हे महाराष्ट्राला मान्य नाही. ही स्वाभिमानाची गादी आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्याग केला. त्यांच्या सर्व वंशजांनी भाजपशी तडजोड केली, अशी टीका त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT