सातारा

फलटण-महाड भक्ती-शक्ती महामार्गाचा प्रस्ताव

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी फलटण-सुरुर-वाई-महाडमार्गे जेएनपीटी-मुंबई असा भक्ती-शक्ती ग्रीनफिल्ड मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला आहे. दोघांनीही या आराखड्याला सकारात्मकता दर्शवली आहे. या ग्रीनफिल्ड मार्गाचा फायदा सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे.

सातार्‍यासह सांगली तसेच कोल्हापूरहून मुंबईला जाणार्‍या प्रवाशांना पुणे आणि पनवेलमधील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबईला जाताना हे अंतरही अधिक असल्याने प्रवासास वेळ लागतो. फलटण-सुरूर-वाई-महाडमार्गे गोवा महामार्गाने जेएनपीडी- मुंबई असा ग्रीनफिल्ड हायवे झाल्यास विक्रमी कमी वेळेत प्रवाशांना मुंबई गाठणे शक्य होणार आहे. शिवाय वेळेची आणि इंधनाचीही बचत होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारा हा मार्ग असल्याने उद्योग, व्यवसाय याशिवाय नैसर्गिक, धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. त्यामुळे हा मार्ग प्रस्तावित भक्ती-शक्ती ग्रीनफिल्ड महामार्ग ठरणार असून तो मार्गी लावावा, अशी मागणी सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी व नागरिकांतून जोर धरू लागली आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरून व पुढे 'मुंबई एक्स्प्रेस-वे'वरून मुंबईला जाताना पुण्यातील कात्रज ते वाकड यादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचीही दमछाक होते. सुट्टीच्या दिवशी तर महामार्गावरील खंबाटकी, कात्रज बोगदा हमखास जाम असतो. प्रवासाच्या जवळपास निम्मा वेळ या वाहतूक कोंडीत जात असतो. दोन-तीन तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याशिवाय गत्यंतर नसते. महामार्गाचे चौपदरीकरण-सहापदरीकरण झाले असले तरी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मात्र काही ठिकाणी कायम असल्याचे दिसते. त्यामुळे ट्रॅफिक जॅमच्या कटकटीतून सुटका करुन घेत मुंबईला जाण्यासाठी जवळचा व पर्यायी मार्ग सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे फलटण, सातारा, कोरेगाव, वाई आदि भागांतील लोकांनी एकत्र येऊन केंद्रीय जहाज बांधणी व दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लोकांनी निवेदन दिले आहे. दोघांनीही या ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती या महामार्गासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा करणारे नितीन चव्हाण यांनी दिली.

हा महामार्ग झाल्यास सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबईला ये-जा करण्यासाठीच्या वेळेत बचत होणार आहे. ग्रीनफिल्ड मार्ग झाल्यास जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांतून कोयना बॅक वॉटरवर दरे (ता. जावली) येथे नियोजित उड्डाणपूल होत आहे. या पुलाचे काम झाल्यावर रघुवीर घाट ओलांडून कोकणात जाणे आणखी सोपे होणार आहे. दुष्काळी खंडाळा- कोरेगाव उत्तर-खटाव या तालुक्यांतून एक ग्रीनफिल्ड मार्ग मंजूर झाला आहे. जिल्ह्याच्या विकासाचा समतोल राखण्यासाठी हे सर्व महामार्ग होण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

पर्यटनाला चालना मिळणार…

प्रस्तावित महामार्ग सध्याच्या महाड-सातारा रस्त्याला उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्याचा महाबळेश्वर-महाड मार्ग हा घाटवळणांचा असल्यामुळे अवजड वाहनांना जिकिरीचा ठरतो. मात्र प्रस्तावित महाड महामार्ग समुद्रसपाटीपासून अवघ्या 800 मीटर उंचीवर असल्यामुळे इंधनाची बचत होणार आहे. मुंबईवरुन पंढरपूर या धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी या ग्रीन फिल्डचा वापर होऊ शकतो. जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोली, ठोसेघर तसेच रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट, हरिहरेश्वर, श्रीवर्धन ही पर्यटनस्थळे जोडली जाऊ शकतील. महाडवरून दापोली, कर्दे, मुरूड बीच याठिकाणी जाण्यासाठीही पर्यटकांना हा मार्ग सोयीचा ठरु शकेल. थेट जेएनपीटी येथे जोडणारा हा मार्ग असल्याने पश्चिम महाराष्ट्राला व्यावसायिकदृष्ट्या फायद्याचा ठरणार आहे.

असा आहे प्रस्तावित ग्रीनफिल्ड मार्ग…

फलटण-वाठार स्टेशन-सुरूर-वाई-धोम धरणमार्गे-ढवळे-महाडपर्यंत सुमारे 100 कि.मी. आणि त्यापुढे महाड ते जेएनपीटी सुमारे 120 कि.मीचा हा प्रस्तावित ग्रीनफिल्ड मार्ग असेल. हा मार्ग आठ रस्त्यांना जोडणारा असेल. त्यामध्ये आळंदी-पंढरपूर पालखी महामार्ग, बारामती-संकेश्वर, पुणे-बंगळूरला पर्यायी मार्ग, नवीन रेवास-रेड्डी कोस्टल मार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, अलिबाग-विरार, मुंबई-चिर्ले हा ट्रान्स हर्बल लिंक, महाड-पेण मार्ग या मार्गाचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT