सातारा : पुढारी वृत्तसेवा
पालकांना आपल्या मुलांच्या करिअरसाठी खात्रीशीर व सुरक्षित पर्याय हवा असतो. आपले नातेवाईक असलेल्या क्षेत्रातच जाण्याचा कल विद्यार्थ्यांचा असतो. शिक्षणाचे क्षेत्र विस्तारत असून आज अनेक संधी उपलब्ध आहेत. 'पुढारी'ने आयोजित केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य व प्रशंसनीय आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून 'पुढारी'ने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. विविध शैक्षणिक कोर्सेसची माहिती एकाच छताखाली मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्याचे काम या उपक्रमातून होत आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गौरवोद्गार काढले.
दै.'पुढारी'च्या वतीने पोलिस करमणूक केंद्रात अलंकार हॉलमध्ये आयोजित 'पुढारी एज्यु दिशा' प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, लातूरचे प्रा. प्रमोद घुगे, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे थॉमस अघमकर, दै.'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, दै.'पुढारी'चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भेडसगावकर, इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर, डॉ. अर्चना ऐनापुरे, रोहन मुळे, डॉ. राजेश जाधव प्रमुख उपस्थित होते.
शेखर सिंह म्हणाले, सातारा जिल्ह्यातील मुले एमपीएससी, यूपीएससी परीक्षेत चमकत असल्याने आनंद होत आहे. यापूर्वीही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले असून त्यातून एक यशस्वी परंपरा निर्माण झाली आहे. यूपीएससी मुलाखत तयारीच्या निमित्ताने कराडचा रणजीत यादव भेटला होता. आम्ही या परीक्षेच्या द़ृष्टीने सातार्यात काय आहे, काय नाही, विद्यार्थ्यांच्या समस्या काय, आव्हाने कोणती आहेत याच्यावर विस्तृत चर्चा केली. सातार्यासारख्या जिल्ह्यातून चार-चार विद्यार्थी आयएएस होत आहेत. येथील विद्यार्थ्यांनी चांगली दिशा घेतली आहे. ओंकारसारखे रोल मॉडेल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना भेटत राहिले तर शेकडो विद्यार्थी यूपीएससीची तयारी करतील, असेही ते म्हणाले.
शेखर सिंह म्हणाले, 'पुढारी'च्या वतीने आयोजित 'एज्यु दिशा' उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. 'पुढारी'चे हे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे. तीन दिवसांच्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील शिक्षण तज्ज्ञ, मान्यवर तसेच वेगवेगळ्या शाखांचा विचार करून 'पुढारी'ने चांगले नियोजन केले आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. लहान मुलांच्या कलचाचणीचाही या प्रदर्शनामध्ये समावेश करता येऊ शकतो. देशात या चाचणीचा फार कल दिसून येत नाही. घरातील व्यक्ती किंवा नातेवाईक ज्या क्षेत्रात असतील त्या क्षेत्रात जाण्याचा कल अधिक असतो. दहावी, बारावी, पदवी शिक्षणानंतर करियर निवडीवेळी मुले गोंधळलेली असतात, त्यावेळी त्यांची कल चाचणी महत्वाची ठरु शकते.
'पुढारी'च्या एज्यु दिशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना योग्य करियर निवड करता येवू शकते. विशेषत: पालकांना आपल्या मुलांच्या करियरसाठी सुरक्षित व खात्रीशीर पर्याय हवा शकतो. मुलांचा एखाद्या फील्डमध्ये जास्तच इंटरेस्ट असेल तर त्याचीही दखल घ्यावी. आज मेडिकल, इंजिनियरिंग एवढेच नसून बरेच पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत. त्यादृष्टीने 'पुढारी'ने उचललेले पाऊल अतिशय महत्वाचे आहे. इंजिनिरिंग आणि मेडिकल या क्षेत्रावर फोकस चांगलाच आहे. त्याची गरज असून कोविड काळात आपण खूप भोगलंय. या अभ्यासक्रमाशिवाय 'पुढारी'ने अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामध्ये आणखी काही शाखांचा समावेश करता येईल, असे त्यांनी सांगितले.
शेखर सिंह म्हणाले, विद्याथ्यार्ंशी संवाद साधण्याची मला खूप आवड आहे. मात्र दोन वर्षे कोरोना काळात शाळा, महाविद्यालये बंद होती. 'पुढारी'च्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. कोणतेही चांगले कार्य करताना त्याला वयाचे बंधन नसते. संगीताची आवड असणारे सत्तरीतही त्याचे धडे घेवू शकतात. पालकांनी मुलांची आवड ओळखून त्याला कृतीची जोड दिली पाहिजे. पालक व वाचकांनी या उपक्रमाला आवर्जून भेट द्यावी. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या, मुलांच्या करिअयरसंबंधी नवी दालने समजू शकतील. युपीएससीत यश मिळवणार्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमांना बोलावले जाईल. त्याची ही सुरुवात आहे. युपीएससीतील कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना बोलावून याठिकाणी 'पुढारी'ने त्यांचा यथोचित सन्मान केला याचे खूप समाधान वाटले, असेही ते म्हणाले.
हरीष पाटणे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वाधिक प्रभावशाली, आक्रमक वृत्तपत्र म्हणून 'सातारा पुढारी'ची ओळख आहे. 'पुढारी'चे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधवसाहेब, 'पुढारी'चे समूह संपादक डॉ. योगेशदादा जाधवसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 'पुढारी' एज्यु दिशा हा उपक्रम सुरु झाला. एकाच छताखाली एकाच व्यासपीठावर सर्वांना माहिती मिळून विद्यार्थ्यांची व पालकांची गोंधळलेली स्थिती या 'पुढारी एज्यु दिशा' प्रदर्शनामुळे दूर होणार आहे. आदर्श करियर करण्यासाठी त्यांना वाटाड्या मिळावा या हेतूने 'पुढारी'ने सुरु केलेल्या या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. यावेळी 'पुढारी'च्यावतीने समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे स्वागत केले तर 'पुढारी' परिवाराने सहभागी संस्थांच्या प्रमुखांचे स्वागत केले. सूत्रसंचलन मयूरेश एरंडे यांनी केले.
11 ते 12 वा. : करिअर अपॉर्च्युनिटी इन हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री (प्रिया सावरकर)
12 ते 1 वा. : व्यवस्थापन शिक्षण आणि करिअरच्या संधी (रणधिरसिंह डी. मोहिते)
4 ते 5 वा. : मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील करिअरच्या संधी (डॉ. मिलिंद कुलकर्णी)
5 ते 6 वा. : तुम्ही तुमचे योग्य करिअर कसे निवडाल? (प्रा. डॉ. नितीन कदम)