पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या दौर्यावेळी पाचगणीचे मुख्याधिकारी गैरहजर होते. एकीकडे महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न व प्रेझेंटेशनमुळे महाबळेश्वरला बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी छप्पर फाडके निधी दिला. त्याचवेळी पाचगणीचे मुख्याधिकारी दापकेकर गैरहजर राहिल्याने पाचगणी मात्र निधीपासून वंचित राहिली. त्यामुळे मुख्याधिकार्यांच्या निष्क्रियतेबाबत पाचगणीकरांमध्ये संताप उसळला असून त्यांच्या बदलीची मागणी होत आहे.
पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर कधी मंत्रालय तर कधी अधिकार्यांना भेटायला गेल्याचे कारण दाखवत कार्यालयात गैरहजर राहतात. चुकून कार्यालयात आलेच तर केवळ खास व्यक्तींच्याच तसेच नगरसेवकांच्या गोतावळ्यात तासन् तास महत्त्वपूर्ण चर्चेच्या नावाखाली सर्वसामान्यांना ताटकळत ठेवतात, अशा तक्रारी यापूर्वीच त्यांच्याबाबत होत्या. आता तर मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर दौर्यातही दापकेकर गैरहजर होते. मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीसाठी पाचगणी नगरपालिकेचा प्रतिनिधी पाठवून दापकेकर यांनी आपली उदासीनता दाखवून दिली. मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातील दौर्यावेळी मुख्याधिकारी हजर राहत नाहीत, हा प्रोटोकॉल न पाळण्याचा विषय संशोधनाचा बनला आहे. त्यांची अनुपस्थिती पाचगणी शहराच्या विकासाला खीळ घालणारी आहे तसेच राजशिष्टाचाराचा भंग करणारीही ठरली आहे.
महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील मुख्यमंत्र्यांच्या दौर्यात सातत्याने महाबळेश्वरच्या विकासासाठी वेगवेगळ्या मागण्या करून पाठपुरावा करताना दिसतात. मुख्यमंत्र्यांच्या सलग दोन दौर्यात त्यांनी प्रेझेंटेशन करून महाबळेश्वरसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून खेचून आणला. प्रशासकीय अधिकार्यांनी योग्य प्रेझेंटेशन केले तर शहराचा कायापालट होऊ शकतो, हे पल्लवी पाटील यांच्या कार्यक्षमतेने दाखवून दिले. त्याचवेळी पाचगणीचे मुख्याधिकारी मात्र आपल्या शहरासाठी दोनही दौर्यात प्रेझेंटेशन करताना दिसले नाही. त्यामुळे पाचगणीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुख्याधिकार्यांसह पाचगणी शहरातील लोकप्रतिनिधीही पाचगणीच्या विकासासंदर्भात अनभिज्ञ असल्याचे दिसत आहेत. त्यांनीही मुख्यमंत्र्यांची विकासासाठी भेट घेतली नाही. त्यामुळे पाचगणीच्या सामान्य जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यातल्या सर्वच पर्यटन स्थळांवर निधीची खैरात होत असताना पाचगणीचे लोकप्रतिनिधी व नगरपालिकेचे मुख्याधिकारी या दौर्यामध्ये सामील झाले नाहीत. एकीकडे पाचगणी पर्यटन वर्षानुवर्षे कात टाकायला तयार नाही, नव्याने पर्यटन निर्मिती व्हायला तयार नाही, अशातच खर्या अर्थाने विकासकामे व नवीन पर्यटन निर्मितीसाठी ठोस उपाययोजनांची गरज असताना दारात मुख्यमंत्री येऊनही त्याची दखल मात्र पाचगणी नगरपालिका व लोकप्रतिनिधींकडून घेतली गेली नाही. त्यामुळे पाचगणी जनतेत नाराजीचा सूर आहे.