पुणे ; पुढारी वृत्तसेवा : हवामानशास्त्र विभागाने कोकणसह मध्य महाराष्ट्राला 11 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणाला तीन दिवस, तर सातारा व पुणे जिल्ह्याला आगामी दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे.
दक्षिण पाकिस्तानात अतितीव- कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. भारतात अहमदाबाद, गुना, गोपाळपूर भागावरही तीव- कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालचा उपसागर व ओडिशा, महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी या भागातही कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यात पाऊस आणखी वाढणार आहे.
आता 11 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना दिला आहे. 10 जुलैनंतर पाऊस ओसरेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र गुरुवारी पावसाचा जोर आणखी एक दिवसाने वाढणार असल्याचा नवा अंदाज देण्यात आला.