सातारा

निष्ठावंत शिवसैनिक ना. शंभूराज देसाईंच्या सोबतच

Arun Patil

सणबूर : तुषार देशमुख : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मल्हारपेठ निष्ठा यात्रेला सर्व पक्षांची मिळून जेवढे लोक होते त्याच्या पन्नास पट शिवसैनिक जमवून उत्तर देणार असे आवाहन उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दिले होते ते तंतोतंत खरे करत दौलतनगर (मरळी) येथे सहा ते सात हजार शिवसैनिक जमवून मोठे शक्ती प्रदर्शन केले.

ना. देसाई यांच्या वर प्रेम करणार्‍या असंख्य कार्यकर्त्यांनी कराड पासून दौलतनगर पर्यंत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची उधळण करत गावोगावी जोरदार स्वागत केले. शिंदे गटात सामील झाल्याबद्दल त्यांचे जोरदार समर्थन केले आणि हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात ठप्प झालेल्या विकासकामांचा बॅकलॉक भरून काढा अशी विनंती यावेळी शिवसैनिकांनी ना. देसाई यांना केली.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याप्रमाणेच मंत्री पदाला लाथ मारुन महाविकास आघाडीतुन बाहेर पडलेले उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने महाविकास आघाडीला ठासून विरोध करत काडीमोड घेतला. पाटण तालुक्यात शंभूराज देसाई यांना जोरदार धक्का अशा वावड्या उठल्या होत्या. परंतु मंत्री शंभूराज देसाई यांच्या मेळाव्याने आणि रॅलीने तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिक कोणाबरोबर आहे हे दाखवून दिले.

जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यात ना. शंभूराज देसाई यांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या वटवृक्षाखाली शिवसेना वाढवणे म्हणजे एक प्रकारे आव्हानच होते सातारा जिल्ह्यात साधा एक ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य नव्हता तेव्हा येथील प्रस्थापितांच्या विरोधात ना. देसाई यांनी लढा उभारुन पाटणच्या पंचायत समितीवर भगवा फडकवला आणि जिल्हा परिषदेत देखील शिवसेनेचे सदस्य पाठविले विरोधी पक्षातील विरोध असताना स्वतःच्या पक्षातील झारीतले शुक्राचार्य काही कमी नव्हते त्यांनी देखील ना. देसाई यांना प्रचंड छुपा विरोध केला. या सर्वांचा विरोध मोडीत काढत मंत्री शंभूराज देसाई यांनी तालुक्यासह जिल्ह्यात शिवसेना वाढवली. तोच शिवसैनिक आज शंभूराज देसाई यांच्या बरोबर उभा राहिला.

ना. शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडताच शिवसेना जिल्हा प्रमुखांसह पं.स. सदस्य, जि.प. सदस्य शेकडो सरपंच, सोसायटीचे चेअरमन यांच्यासह जवळपास सर्वच पदाधिकारी बाहेर पडले आणि ना.देसाई यांच्या भुमिकेचे उघडपणे समर्थन केले. त्यामुळे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची गोची झाली. मुंबई वरुन कार्यकर्ते आणून त्यांना तालुक्यात पदे देण्याची वेळ आली. यातून एक गोष्ट सिध्द झाली तालुक्यातील पदाधिकार्‍यांसह मुळचा निष्ठावंत शिवसैनिक हा ना. शंभूराज देसाई यांच्या सोबत उभा राहिला आहे.

खर तर स्वत:च्या हिमतीवर आणि कर्तृत्वावार शंभूराज देसाई यांच्या रुपाने शिवसेनेला तिन वेळा एक कर्तबगार आमदार मिळाला एक अभ्यासू नेतृत्व आणि कोणालाही आंगावर घेण्याची धमक असलेल्या कडवट शिवसैनिकाला महाविकास आघाडीत सेनेची गरज म्हणून आणि महाविकास आघाडीत शिवसेनेचे वेगळे आस्तित्व राखण्यासाठी शंभूराज देसाई यांना राज्यमंत्री केले. तात्कालिक विरोधी पक्षनेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधिर मुनगंटीवार, शिरीष महाजन, प्रविण दरेकर यांच्यासह अनेकांना शिवसेनेची ढाल बनून अंगावर घेतले बदल्यात काय मिळाले तर अधिकार नसलेले मंत्रीपद.

यातून शिवसैनिकांना न्याय देता येत नाही त्यामुळे मंत्रीपदावर लाथ मारुन बाहेर पडलेले शंभूराज ना. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये आता कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्यातील लढवय्ये गुण ओळखून सातारचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभूराज देसाई यांना उत्पादन शुल्क मंत्री केले आणि तातडीने 75 कोटी निधी दिला.

विधानसभा निवडणुकीची नांदी

मंत्री शंभूराज देसाई यांच्या मेळाव्यात शिवसैनिकांनी केलेली गर्दी पाहता तालुक्यातील मुळचा शिवसैनिक ना. देसाई यांच्याच बरोबर असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य राखण्यात ना. शंभूराज देसाई यशस्वी होतील यात काही शंका नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT