सातारा

दहिवडीत चोरट्यांनी दारू दुकान फोडले; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

अनुराधा कोरवी

दहिवडी : पुढारी वृत्तसेवा : दहिवडी येथील गोंदवले रस्त्यावर असलेल्या वाईन शॉपची मागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी विदेशी दारू व बीअर बाटल्यांसह सीसीटीव्हीचे संपूर्ण साहित्य असा सुमारे २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेने दहिवडीसह परिसरात खळबळ उडाली आहे.

माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव यांचे दहिवडी-गोंदवले रस्त्यावर' वाईन शॉप आहे. रविवारी मध्यरात्री सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या एका बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी आतून दारूच्या बाटल्या बाहेर दिल्या व कारमध्ये भरल्या. तसेच एक वायफाय राऊटर व सीसीटीव्हीचे साहित्य लंपास केले.

दरम्यान, हॉटेल मालकांच्या घरातील काही व्यक्ती शेतात पाणी देऊन घरी परतत असताना त्यांना त्यांच्या वाईन. शॉप जवळ एक कार दिसली. या कारची चौकशी करण्यासाठी ते लोक पुढे गेले असता चोरट्यांना त्यांची चाहूल लागल्याने त्यांनी तेथून पोबारा केला. ही कार गोंदवल्याच्या दिशेने निघून गेली. वाईन शॉपच्या मालकांनी चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु, ते पसार झाले. वाईन शॉपचे मालक माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तपास पोलीस सब इन्स्पेक्टर देवानंद तुपे करत आहेत.

एकतानगरमध्ये घबराट…

एकतानगर परिसरातील काही मोटरसायकली चोरण्यासाठी चोरटे रविवारी रात्री आल्याची चर्चा आहे. त्यातच काही मोटर सायकलची कुलपेही तुटल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी अशीच एक टोळी एकतानगर परिसरातील बंद घरांची कुलपे तोडून चोऱ्या करत होती. परंतु काही चोऱ्या झाल्यावर पोलिसांनी शिताफीने चोरट्यांना जेरबंद केले होते. आता पुन्हा याच परिसरात चोऱ्या होऊ लागल्याने व चोरटे फिरु लागल्याने परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीचे गस्त पथक सक्रिय करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT