सातारा : मीना शिंदे
जुन्या रुढी, परंपरांचा पगडा राहिल्याने इतके दिवस विधवांना सण-समारंभ, लग्नसोहळे, इतर सामाजिक कार्यांमध्ये डावलले जात होते. मात्र, आता विधवा प्रथा बंदीला प्रोत्साहन देत जकातवाडी पॅटर्न राज्यभर राबवण्याबाबत लोकप्रतिनिधींमधून सूर उमटू लागले आहेत. त्यामुळे तीच्या आत्मसन्मानासाठी पुन्हा एकदा अंधश्रध्देला मूठमाती दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात विधवा प्रथा बंदीचे ठराव होऊ लागले आहेत.
भारताने आज विज्ञानासह सर्वच क्षेत्रांत क्रांती केली असली तरी समाजात आजही विधवा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. विधवांना सण-समारंभांसह, लग्नसोहळे, सर्वच सामाजिक कार्यांमध्ये डावलले जात होते. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि अविभाज्य संस्कार असून तो समानतेवरच टिकतो. समाजाने महिलांना दुजाभावाने वागवू नये, विधवांप्रती असणार्या अनिष्ठ प्रथा बंद होण्याची गरज आहे. पण, रुढी-परंपरांच्या पगड्याने सारेच मुसळ केरात होते. पण, सातारा जिल्ह्यातील एक गाव पुढे आले आणि एक वेगळीच क्रांती घडू लागली.
जकातवाडी, ता. सातारा येथील ग्रामपंचायतीने डिसेंबर 2018 मध्ये पहिल्यांदाच विधवा प्रथा बंद करत पुरोगामीत्वाकडे वाटचाल केली.विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन म्हणून 20 हजार रुपये अनुदान देण्याचा ठराव संमत करण्यात आला. येथील ग्रामस्थांनी जकातवाडी पॅटर्न राज्यभर राबवण्याची मागणी खा. सुप्रियाताई सुळे यांच्याकडे निवेदन देवून केली. आता विधवा प्रथा बंदीला प्रोत्साहन देत जकातवाडी पॅटर्न राज्यभर राबवण्याबाबत लोकप्रतिनिधींमधून सूर उमटू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड येथे विधवा प्रथा बंदीबाबत ठराव घेण्यात आला. त्यानंतर राज्य शासनानेही दि. 18 मे रोजी विधवा प्रथा बंदीबाबत परिपत्रक काढले. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी विधवा प्रथा बंद करण्याबाबतचे ठराव घेतले जावू लागले आहेत.
प्रतिकं नष्ट करणं पुरेसं नाही. पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे आलेली गुलामगिरी नष्ट होणं गरजेचं आहे. विधवा महिलांना पतीच्या संपत्तीचा वारसा तसेच तिला सर्व प्रकारचे संरक्षण मिळायला हवे. पतीच्या हयातीतच त्याची संपत्ती व घर, जमिनीला तिचे नाव मिळाले पाहिजे.विधवांना पुनर्विवाहाबरोबरच आर्थिक स्थैर्य गरजेचे आहे.
– अॅड. वर्षा देशपांडे, लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक.