सातारा

तरुणाईच्या कानात सर्रास हेडफोन; कर्णबधिरतेचा धोका

दिनेश चोरगे

सातारा; मीना शिंदे :  काळाची गरज आणि तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईलसह विविध गॅझेटचा वापर वाढला आहे. ऑनलाईन कामांसह सुलभतेच्या कारणास्तव सर्रास तरुणाईच्या कानात ब्ल्यूटूथ, हेडफोनसारखी गॅझेट दिसत आहेत. या गॅझेटच्या अतिरेकामुळे कानदुखी, डोकेदुखीसह कमी वयातच कर्णबधिरतेचा धोका वाढला आहे. काळाची गरज असली तरीही गॅझेटच्या वापरावर मर्यादा आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

हल्ली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्तींकडून स्मार्ट फोन हाताळला जात आहे. त्यासोबतच विविध गॅझेटस्चाही वापर होवू लागला आहे. त्यातही आलेले फोन घेणे व बोलणे सहज व्हावे, यासाठी हेडफोनला प्राधान्य दिले जावू लागले आहे. सार्वजनिक ठिकाणी फोन वर मोठ्या आवाजात संभाषणासाठी इयरबडसह विविध गॅझेट वापरली जातात. अनेकांच्या गळ्यात ब्ल्यूटूथ, कनेक्टेड हेडफोन अडकलेले दिसतात. ही गॅझेट वापरात जितकी सहज तितकेच अमर्याद वापराचे दुष्परिणाम जास्त आहेत. या ब्ल्यूटूथ व हेडफोन वापराच्या अतिरेकाने डोकेदुखी, कान दुखी, मान दुखी सारखे आजार बळावू लागले आहेत. तासन्तास कानात गॅझेट राहिल्याने ऐकायला कमी येवू लागले असल्याने कर्णबधिरतेलाही आमंत्रण मिळत आहे. कमी ऐकू आल्याने दैनंदिन व्यवहारातही विस्कळीत पणा येत असून चिडचिडे पणा वाढत आहे. परिणामी मानसिक स्वास्थ्य हिरावले जात आहे. त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञान क्रांतीमुळे निर्माण झालेली विविध गॅझेट मानवी दिनचर्येत गरजेची असली तरी त्याच्या वापरावर मर्यादा आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

चुंबकीय लहरी मेंदूलाही हानीकारक

बाहेरील गोंगाटात फोनवरील संभाषण व संगीत ऐकण्यासाठी मोठ्या आवाजात गॅझेटचा वापर केला जातो. सतत मोठा आवाज ऐकल्याने वयाच्या तुलनेत कमी ऐकू येवू लागते. गॅझेटमधून येणार्‍या चुंबकीय तरंगलहरी कानाबरोबरच मेंदूलाही हानीकारक ठरत आहेत. हेडफोन, ब्ल्यूटूथ व इयरबडचा सतत वापर केल्याने डोकेदुखी, मानदुखीसह मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे. तसेच मानेचे स्नायू जखडण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

कानाची आवाज क्षमता अवघी 65 डेसिबल

कानाची आवाज सहन करण्याची क्षमता 65 डेसीबलपर्यंतच असते. त्यापेक्षा जास्त पातळीवरील आवाज ठेवून अधिकवेळा हेडफोन, ब्ल्यूटूथ व इयरबड वापरल्यास त्याचा दुष्परिणाम कानाच्या क्षमतेवर होतो. बाह्य, मध्य व अंतकर्ण अशी कानाची तीन टप्प्यात विभागणी होत असून कानात ऐकू येणार्‍या पेशींची संख्या 16 हजार असते. मोठ्या आवाजाने या पेशी नष्ट होतात. मोठ्या आवाजाने निर्माण होणार्‍या कंपनांमुळे कानाच्या पडद्यांना इजा पोहोचून कमी ऐकायला येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT