सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी संदर्भातील बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, व्यासपीठावर ना. रामराजे ना. निंबाळकर, ना. बाळासाहेब पाटील, ना. शंभूराज देसाई. (छाया : साई फोटो) 
सातारा

डोंगराखालील गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार : अजित पवार

अमृता चौगुले

सातारा : पुढारी वृत्तसेवा : डोंगराखालील गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात सांगितले. सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात वृक्षतोडीमुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याची चर्चा आहे. परंतु, ही घटना का घडली? याचा शोध घेण्यासाठी तज्ञांची मदत घेतली जाणार आहे. भविष्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडूच नये यासाठी डोंगराखालील गावांचे कायमचे पुनर्वसन करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. आत्तापर्यंत आपल्या जागा सोडायच्या नाहीत अशी लोकांची मानसिकता असल्याने असे पुनर्वसन रखडले. मात्र, आता जीव जावू लागल्याने सक्तीने पुनर्वसन कसे करता येईल याबाबत विचार करू, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सातार्‍यात पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना तातडीने 5 लाखाची मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नुकसानीचे पंचनामे 15 ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश त्यांनी दिले.

सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दिपक चव्हाण उपस्थित होते.

ना. अजितदादा पुढे म्हणाले, या दुर्घटनेनंतर पुनर्वसनाबाबत लोकांची मानसिकता बदलली आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून हे काम आता सुरू झाले आहे. ज्यांच्या जमिनी या भागात आहे त्यांच्याबाबत थोड्या अडचणी आहेत. परंतु, ज्यांच्या जमिनी नाहीत त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. तसेच ज्यांच्या या भागात जमिनी आहे त्यांचे दुसर्‍या ठिकाणी पुनर्वसन करून त्यांना शासनाच्या जमिनी देणे व त्यांच्या वैयक्तिक जमिनी शासनाकडे घेण्याबाबत विचार सुरू आहे.

ना. अजितदादा पवार म्हणाले, प्रशासनाने पिकांचे पंचनामे सुरू केले आहे. यासाठी साधारण 8 दिवसांचा कालावधी लागणार आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्य शासन 5 व केंद्र सरकार 2 लाख अशी 7 लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा काढला त्यांना अतिरिक्त दोन लाख रूपये देण्याचे विचाराधीन आहे. याचबरोबर ज्यांनी पिकांचा विमा काढला होता त्या विम्याचे पैसे त्यांच्या शेतकर्‍यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 170 पाणी पुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई भासत आहे. त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या योजनांचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकसानग्रस्त भागातील बाधित लोकांना लसीकरण प्राधान्याने करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले.

दोन दिवसात नवजाला 48 ते 50 इंच पाऊस झाला. यापूर्वी इतका पाऊस पडला नाही. 24 तासात साडे सोळा टीएमसी इतका पाणीसाठा झाला. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीवेळी 12 टीएमसी पाणी साठले होते. अतिवृष्टीचा इशारा असल्याने प्रशासनाने यापूर्वीच काळजी घेतली होती. त्यानुसार नागरिकांना इशारा देण्यात आला होता. गतवर्षी कोयना खोर्‍यातील धरणांमध्ये आजच्या तारखेला 50 टक्के पाणीसाठा झाला होता. मात्र, यंदा हाच पाणीसाठी 85 टक्क्यांवर गेला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने सांगली व कोयना, कृष्णा काठच्या गावांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्ह्यात चार एनडीआरएफच्या टीम कार्यरत आहेत. बाधित गावांमधील नागरिकांचे स्थलांतर केले आहे, असेही ते म्हणाले.

कोयना वसाहतीची दुरूस्ती करून नुकसानग्रस्त ग्रामस्थांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात येणार आहे. यादृष्टीने संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत. अलमट्टी धरणातूनही साडे तीन लाख क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत असल्याने सांगली व कोल्हापूरची पाणी पातळी हळूहळू खाली होवू लागली आहे. त्यादृष्टीने सांगली, सातारा व कोल्हापूरसाठी कोयनानगर येथे पूरव्यवस्थापन यंत्रणा कायमस्वरूपी उभी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोयनेच्या पुनर्वसनाबाबत ते म्हणाले, निर्सग व लोकांच्या मानसिकतेमुळे विलंब झाला आहे. कोयनेच्या 100 टक्के लोकांचे पुनर्वसन झाले पाहिजे, असा सरकारचा मानस आहे. यासाठी सरकारकडून लागेल तेवढा निधी दिला जाणार आहे. कोयना धरण बांधल्यानंतर सुरूवातीच्या काळात पुनर्वसनचा प्रश्न भेडसावला नाही. परंतु, कोयनेत झालेला पाणीसाठा व भुकंप यामुळे पुनर्वसनाच्या प्रश्न ऐरणीवर आला. पुनर्वसनासाठी राज्य शासनाने वेळोवेळी प्रयत्न केले गेले आहे. यामध्ये नैर्सगिक आपत्ती, नागरिकांची मानसिकता या अडचणी आल्या. तसेच येथील लोकांचे कायस्वरूपी पुनर्वसन करण्याला प्राधान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानबध्दतेची चौकशी करा

भूस्खलन झाल्यानंतर मदत कार्य करणार्‍या श्रमिक मुक्ती दलाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबध्द केले होते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच ना. अजित पवार यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांना विचारणा केली. कोणाच्या सांगण्यावरून त्यांना स्थानबध्द करण्यात आले त्याची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश ना. पवार यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT