सातारा

डाळिंबात फुलला गांजा; कर्जमुक्तीच्या नादात वाजला बॅंडबाजा

दिनेश चोरगे

सातारा; विठ्ठल हेंद्रे :  माण तालुक्यातील एका शेतकर्‍याने कर्जमुक्तीसाठी अजब प्रकार केला. त्याने चक्क डाळिंबाच्या बागेत गांजा फुलवला. या अजब फंड्याने त्याच्या हाती बेड्या पडल्या. कर्जमुक्तीच्या नादात उचललेल्या चुकीच्या पावलामुळे त्याचा अक्षरश: बेंडबाजा वाजला. कुंडलिक खांडेकर (रा. खडकी, ता. माण) या शेतकर्‍याचा सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा 422 किलो गांजा पकडण्यात आला. दुष्काळी भागात अमली पदार्थाची शेती व संपूर्ण जिल्ह्यात विक्री ही चिंतेची बाब निर्माण झाली आहे. नशा करणार्‍यांमध्ये युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेही वास्तव आहे. या सर्व बाबी समोर ठेवून पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना अमली पदार्थ कारवाईच्या सूचना केल्या आहेत. तसेच अमली पदार्थाची शेती व विक्रीबाबत माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले असून माहिती देणार्‍यांचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा पोलिस दलाने जिल्ह्यात वाढत चाललेल्या अमली पदार्थांवर 'वॉच' ठेवत त्याचा पर्दाफाश करण्याचा धडाकाच सुरू केला आहे. एकाच आठवड्यात रेकॉर्डब्रेक कारवाई करत दीड कोटी रुपये किमतीचा गांजा व अफू हे अमली पदार्थ जप्त केले.

कुंडलिक खांडेकर यांनी गांजाची शेती करताना खरबदारी घेतली होती. त्यासाठी डाळिंबाची बाग बाजूला होती व डाळिंबाच्या बाजूला मका होता. मका काढल्यानंतर मात्र गांजाची शेती ओपनवर आली. हीच बाब पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी छापा टाकला. दोन वर्षांपूर्वी खांडेकर यांनी ऊसतोडीसाठी मुकादमाला सुमारे 12 लाख रुपये कर्ज काढून दिले होते. मात्र, मुकादमाने फसवले. अशातच काही जणांकडून लाखो हातउसणेही घेतले होते. एकीकडे बँक व दुसरीकडे उसणे घेतलेल्यांकडून पैशांची होत असलेली मागणी, या सर्वांतून सुटण्यासाठी त्यांनी गांजाची शेती करण्याचा निर्णय घेतला.

डोक्यात नोटीस; पण हातात पडल्या बेड्या

बेकायदा दारू विक्री, जुगार खेळल्यानंतर पोलिस नोटीस देतात आणि सोडून देतात, ही बाब खांडेकर यांना माहिती होती. आपण गांजा शेती केल्यानंतरही पोलिस नोटीस देतील, असे त्यांना वाटले. मात्र, पोलिस नोटीस न देता अटकेच्या कामाला लागल्यावर त्यांची चुळबुळ वाढली. 'कशाला वाढवताय साहेब, द्या की नोटीस अन् करा की मोकळे', असे ते पोलिसांना बोलू लागले. पोलिसांनी पण आश्चर्य व्यक्त केल्यानंतर नोटीस कोणी सांगितले? असे विचारताच त्यांनी स्पष्टीकरण दिले. यावर पोलिसांनी दारू विक्री, मटका, जुगार कारवाई ही गांजा कारवाईपेक्षा कशी बेलेबल व नॉनबेलेबल आहे हे कायदेशीर कसे गंभीर आहे, हे सांगितले. पोलिसांनी कायदेशीर माहिती देताच खांडेकर यांनी डोक्याला हात लावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT