सातारा

चाफळ : टोमॅटोचे दर गडगडल्याने शेतकरी चिंतेत

सोनाली जाधव

चाफळ : राजकुमार साळुंखे
कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या टोमॅटो पिकाचे यावर्षी भाव गडगडल्याने सर्वच भागातील शेतकर्‍यांना खूप तोटा सहन करावा लागत आहे. टोमॅटो उत्पादन करणार्‍या संबंधित शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होणार असल्याने तो हवालदिल झाला आहे.
चाफळसह, माजगाव, दाढोली, गमेवाडी, शिंगणवाडी, डेरवण, वाघजाईवाडी, जाधववाडी, केळोली, खोनोली, नाणेगांव, खराडवाडी परिसरातील शेतकरी अल्पकाळात भरपूर रोख उत्पन्न देणारी पिके म्हणून अनेक शेतकरी टोमॅटो हे पीक घेतात. टोमॅटोचे पीक नगदी व भांडवली असल्याने लागवडीपासून या पिकासाठी भांडवली गुंतवणूक करावी लागते. नवनवीन सुधारित जातीने वैशाली, रूपाली, नामधारी रश्मी इत्यादी टोमॅटोचे वाण बाजारात आले आहेत. 100 ग्रॅम बियाण्यांसाठी 1500 रुपयांपर्यंत लागवडीसाठी खर्च होतो. लागवडीपासून प्रत्यक्ष उत्पन्न सुरू होईपर्यंत या पिकाची खूपच काळजी घ्यावी लागते. शिवाय खर्चही मोठा येतो. यामध्ये कीटकनाशक फवारणी खर्च आंतरमशागतीचा खर्च खतांची खर्च असतोच; परंतु याहीपेक्षा खर्चिक काम असते ते टोमॅटो झाडांना फळे आल्यानंतर आधार देण्यासाठी लागणार्‍या काठ्या व बांधाव्यास लागणार्‍या तारा, सुतळ्या आणि त्यासाठी द्यावी लागणारी मंजुरी ज्यावेळी प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होते. त्यावेळी ही खर्च मोठ्या प्रमाणात होतो. तयार माल 20 ते 25 किलो क्षमतेच्या मोकळ्या खोक्यात भरून त्याचे पॅकिंग करून बाजारपेठेत पाठविला जातो. यासाठी 25 रुपये पर्यंत खर्च येतो. सध्या टोमॅटोचे दर 10 ते पंचवीस रुपये आहे. म्हणजेच एका खोक्यात 40 ते 50 रुपयांचा माल असतो यातून वाहतूक खर्च मजुरांची मजुरी आडत खोके किंमत याचा खर्च वजा जाता शेतकर्‍यास एका खोक्यामागे 10 ते 15 रुपये अथवा त्यापेक्षा कमी रक्कम शिल्लक उरते अथवा त्यापेक्षा कमी रक्कम शिल्लक उरते, अशी खंत शेतकर्‍यांनी बोलून दाखवली. एक एकरास पाच हजार किलो पेक्षा अधिक उत्पन्न घेणारे शेतकरी या भागात आहेत. छोट्या छोट्या प्लॉटच्या साह्याने जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन जीवन जगण्यासाठी संघर्ष करणार्‍या शेतकर्‍यांचे टोमॅटोचे भाव घसरल्याने आर्थिक नुकसान होत आहे. या भागातील टोमॅटो मुंबई, वाशी बेळगाव, रत्नागिरी, चिपळूण येथे जातो. टोमॅटोची आवक वाढल्याने दर दोन तीन रुपयांवर आले असून मागणी कमी उत्पन्न अधिक अशी परिस्थिती असल्याने खर्चाच्या तुलनेत कवडीमोलाची किंमत मिळत आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेली असतानादेखील काही शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने पीक वाढले. परंतु त्याचे दर घसरल्याने शेतकरी कोसळू लागला आहे. केलेला खर्चही निघत असल्याची खंत अनेक शेतकर्‍यांनी व्यक्त केली. नजीकच्या काळात दरात वाढ झाली नाहीतर शेतकर्‍यांचे हजारो रुपयांची नुकसान होईल. शेतकरी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटो विकत असून तेथेही आवक वाढल्याने तीन रुपये किलो दराने विक्री होत आहे. एकंदरीत सध्या भाव नसल्याने टोमॅटो शेतात ठेवावा लागत आहे. अनेक टोमॅटो उत्पादक यांनी दर नसल्याने टोमॅटो शेतात ठेवणे पसंत केले आहे. ज्या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शेतकर्‍यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिंगणवाडी येथील प्रगतशील शेतकरी दादासो पोपटराव पवार यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT