सातारा

खटावला पारंपरिक वाद्यांनाही मर्यादा

Shambhuraj Pachindre

खटाव : पुढारी वृत्तसेवा

खटावमध्ये सण, विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमांत पारंपरिक वाद्ये नियमानुसार मर्यादित आवाजात आणि वेळेत वाजवावीत, असे आवाहन सपोनि संदीप शितोळे यांनी केले. डॉल्बी, डिजेला बंदी कायम असून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलिस-पाटील, प्रतिष्ठित नागरिक, बँड व्यावसायिक आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते. खटावमध्ये सुरू असलेला डॉल्बी, डीजेचा कर्णकर्कश दणदणाट त्रासदायक असल्याच्या तक्रारी नेहमीच केल्या जात होत्या. त्या अनुषंगाने सपोनि शितोळे यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली. बैठकीत त्यांनी सण, समारंभात तसेच इतर कार्यक्रमांमध्ये वाजवल्या जाणार्‍या पारंपरिक वाद्यांना नियमानुसार मर्यादीत आवाजात आणि मर्यादित वेळेत वाजवण्याला कोणतीच आडकाठी नसल्याचे सांगितले. मात्र, मर्यादेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

गावकर्‍यांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. बँड व्यावसायिकांनीही नियमानुसारच वादन करण्याची ग्वाही दिली. खटाव मुख्य बाजारपेठ आणि चौका-चौकात असणार्‍या रहिवाशी, व्यावसायिक तसेच रुग्णालयांना डॉल्बीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. काही वर्षांपूर्वी गावाने पारायण मंडपात तत्कालीन पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन डॉल्बीवर बंदी आणली होती. त्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणीही केली होती. खटावने घेतलेल्या त्या निर्णायाचे सर्वत्र कौतुक झाले होते. गावातील विविध मंदिरांमधील ध्वनिक्षेपकही बंद करण्यात आले होते. गावकर्‍यांना ध्वनिप्रदूषणाचा होणारा त्रास ध्यानात घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT