पाटण : पुढारी वृत्तसेवा राज्यात मागील सहा महिन्यांत राजकीय प्रचंड उलथापालथ झाली असून किळसवाण्या राजकारणाने कळस गाठला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले, शिवसेनेमुळे ज्यांना ओळख मिळाली, ज्यांना पक्षाचे उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिले, तेच आमदार, खासदार विश्वासघात करून पक्ष सोडून गेले. भाजप फोडाफोडीचे, विश्वासघाताचे गलिच्छ राजकारण करत आहे. विरोधी पक्ष आणि विचारधारेला नामशेष करण्यासाठी वाटेल ते करणारी ही राजकीय शक्ती संविधानावरघाला घालत असल्याचे सांगत आ. भास्करराव जाधव यांनी यांनी शिंदे गटासह भाजपवर टीका केली.
येथील शासकीय विश्रामगृहात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकनियुक्त सरपंच, सदस्य यांच्या सत्कार समारंभासाठी आलेल्या आ. भास्करराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा संघटक गजानन कदम, जिल्हाप्रमुख हर्षद कदम, तालुकाप्रमुख संदीप सावंत, चंद्रकांत सुवार, उपजिल्हाप्रमुख रविंद्र पाटील यांची उपस्थिती होती.
आमदार जाधव म्हणाले, शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडले की शिवसेना संपेल असं त्यांना वाटले होते. शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी भाजपने केलेल्या करामती विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राग, हेवेदावे विसरून ठाकरे गटाला जनतेने साथ दिली असून जनतेत प्रचंड संताप, चीड निर्माण झाली आहे. महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या मागे ठाम उभा असून उभ्या जन्मात त्यांना लागलेला गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही.
अंधेरी पूर्व निवडणुकीत सुद्धा शिंदे – फडणवीस सरकारने शिवसेना उमेदवारास त्रास दिल्याने न्यायालयात जावे लागले. शिवसेनेला तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना धोका देणार्या सत्ता, मस्ती विश्वासघाताविरोधात कडवे शिवसैनिक लढले आहेत.
यावेळी शिवसेना चूक करणार नाही. गद्दारांच्या जागांवर आपले उमेदवार निश्चित देणार आहे. 1991 ला बंडखोरी करणार्या आमदारांपैकी एकही निवडून आला नाही, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती यावेळी होईल. मविआ म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील जागा राष्ट्रवादीने मागितली तर ते मागू शकतात. हर्षद कदम युवा नेतृत्व असून ते कशी कामगिरी करतात, कसे लढतात ते बघणं गरजेचे आहे.
अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई यांनी अनेक खात्याशी संबंधित प्रश्नांना उत्तर दिली. पण अधिकार्यांनी दिलेली माहिती उत्तर म्हणून दिले. अभ्यासपूर्वक उत्तरे नव्हती आणि त्यात दम पण नव्हता. ज्या विकासकामांचा ढोल शिंदे-फडणवीस सरकार वाजवत आहेत, ती अपवाद वगळता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामे आहेत. ठाकरे सरकारच्या काळात आम्हाला निधी नव्हता, अधिकार नव्हते असं विधान करणारे, पन्नास खोके घेऊन एकदम ओके आहेत ते दुसरे काय सांगणार. शंभूराज देसाईं हवेतून सुरतला गेले, तिथून हवेतून गुवाहाटीला गेले, तिथून हवेतून गोव्याला गेले, तिथून हवेतूनच मुंबईत आले. त्यामुळे देसाई यांचे चालणे, बोलणे आणि एकूण अविर्भाव पाहता त्यांची पावले जमिनीवर राहिली नसून हवेत गेली आहेत असा टोला आ. जाधव यांनी लगावला.
फडणवीस बोले आणि शिंदे हाले' हेच उभा महाराष्ट्र अनुभवत आहे. ' पन्नास खोके, एकदम ओके' हे आता जनताच सांगत आहे. सरकार कोणाचेही असले तरी राज्यावर आपत्ती आली की विरोधक सत्ताधारी एकत्र खांद्याला खांदा लावून लढतात ही आपली संस्कृती आहे. मात्र, कोरोना तसेच उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात संधी साधणार्या भाजपला हेच उद्ध्वस्त करायचे आहे .ज्या शिवसेनेने अनेक काळ भाजपला मित्र मानून विश्वासाने खांद्यावर मान ठेवली, त्याच भाजपने विश्वासघाताने शिवसेनेच्या गळ्याला नख लावले असेही आ. भास्करराव जाधव यांनी सांगितले.