सातारा

कराडमध्ये बड्या हस्ती पालिकेच्या थकबाकीदार यादीत

Shambhuraj Pachindre

कराड : पुढारी वृत्तसेवा

कराड नगरपालिकेचा मालमत्ता करापोटी 31 मार्च 2022 पूर्वीची तब्बल 9 कोटी रुपये थकबाकी पालिकेला अद्याप मिळालेली नसून, शहरातील बड्या हस्तींसह शासकीय कार्यालयांनी अद्याप मालमत्ता कर भरला नसल्याने नागरिकांसह विविध संस्था, सरकारी कार्यालयांची नावे अखेर नगरपालिकेने फ्लेक्सद्वारे झळकवली आहेत.

मात्र ,तरी ही थकीत कर न भरल्यास सुरुवातीला नळ कनेक्शन तोडण्यात येणार असून, त्यानंतर मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. कराड नगरपालिकेचे 31 मार्च 2022 पर्यंत सुमारे 25 कोटी रुपये कर स्वरूपात मिळणे अपेक्षित होते. त्यामुळे पालिकेने मिळकत धारकांना आवाहन करत सूचना देत चांगल्या प्रकारे करवसुली केली. तर कर न भरणार्‍यांवर कारवाई करीत सुमारे 45 मिळकती सील करीत दीडशेहून अधिक नळ कलेक्शन तोडली होती. त्यानंतर मात्र काहीशी कर वसुली झाली, मात्र तरीही ही अनेकांची कर वसूल न झाल्याने पालिकेने थकीत मिळकत धारकांची नावे फ्लेक्सवर लावल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

नगरपालिकेस घरपट्टीच्या माध्यमातून 31 मार्च 2022 पर्यंत 19 कोटी 64 लाख 12 हजार रुपयांची करवसुली अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात 13 कोटी 11 लाख 96 हजार रुपयांची करवसुली करण्यात आली. तर पाणीपट्टीतून 5 कोटी 28 लाख 9 हजार रुपयांची कर वसुली अपेक्षित होती. मात्र प्रत्यक्षात 2 कोटी 90 लाख 10 हजार रुपयांची वसुली झाली. त्यामुळे एकूण 24 कोटी 92 लाख 21 हजारांच्या अपेक्षित वसुली पैकी 8 कोटी 90 लाख 14 हजार रुपयांची वसुली थकीत राहिली आहे.

कराड नगरपरिषदेने 31 मार्च 2022 पूर्वीच्या थकबाकी धारकांना विविध प्रकारे कर भरण्यासंबंधी सूचना केली होती. वेळेत कर न भरल्यास फ्लेक्स वर नावे लावण्याची सक्त ताकीद ही दिली होती. त्यानंतर अनेक थकबाकीदारांनी कोर्टात धाव घेतली होती. यामुळे थकबाकीदारांसाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तडजोडी अंती काहीसा कर भरणा झाला होता. तरीही अपेक्षित वसुली न झाल्याने चार दिवसांपूर्वी नगरपरिषदेने कृष्णा घाटावर 25 हजार रुपये मालमत्ता कर थकीत असणार्‍यांच्या नावासह लाखो रुपये थकीत असणार्‍या संस्थांची नावे असलेले फ्लेक्स बोर्ड लावले आहेत.

शासकीय कार्यालयाची थकबाकीत आघाडी

कराड पालिकेच्या थकबाकीदारांमध्ये कृष्णाबाई घाट ट्रस्टची 46 लाख रुपयांचा कर थकीत आहे तर स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचा ही 25 लाखांहून अधिक कर थकीत असून एक लाखाहून अधिक थकीत असलेल्या सुमारे 40 बड्या हस्तींनीही पालिकेचा कर थकवला आहे. सरकारी धान्य गोडाऊनसह रेव्हूनी क्लब, भारत संचार निगम, मंडल ऑफिस, प्रांताधिकारी निवास, शेती उत्पन्न बाजार समिती, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, दोन तीन पतसंस्था, काही मिळकती वरील टॉवर आदींनी मोठ्या प्रमाणात कर थकवला आहे.

SCROLL FOR NEXT