सातारा

कराड : संपकरी एस.टी. चालकाचा हृदयविकाराने मृत्यू

Arun Patil

कराड ; पुढारी वृत्तसेवा : विविध मागण्यांसाठी जवळपास साडेतीन महिने संपावर असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कराड आगारात कार्यरत असणार्‍या आटके (ता. कराड) येथील एस.टी. चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. बाळकृष्ण बापूसो पाटील (वय 42) असे त्या एस.टी. चालकाचे नाव आहे.

एस.टी. कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासह अन्य काही मागण्यांसाठी मागील साडेतीन महिन्यांहून अधिक काळ संपूर्ण राज्यभर एस.टी. कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनात बाळकृष्ण पाटील हे एस.टी. चालक सहभागी होते. मागील साडेतीन महिन्यांपासून एस.टी. कर्मचारी संप करत असून शासनाकडून न्याय मिळत नसल्याचा दावा एसटी कर्मचार्‍यांकडून होत आहे. न्यायालयातही याबाबत कर्मचार्‍यांनी दाद मागितली आहे.

शासनाकडून न्याय मिळत नसल्याची विंवचना अन्य कर्मचार्‍याप्रमाणे पाटील यांनाही होती. यातच शनिवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी मलकापूर (कराड) येथीलत कृष्णा रूग्णालयात दाखल केले होते. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

एस. टी. कर्मचार्‍यांकडून शासनाचा निषेध

कराड आगारातील एस.टी. कर्मचार्‍यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी कृष्णा रुग्णालयात धाव घेतली होती. बाळकृष्ण पाटील यांचा मृतदेह कराड आगारात नेण्याची आग्रही भूमिका काही एस.टी. कर्मचार्‍यांनी घेतली होती. एस.टी. कर्मचार्‍यांनी शासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्‍त करत आपल्या भावना व्यक्‍त केल्या. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

SCROLL FOR NEXT