कराड : प्रतिभा राजे
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचा विषय कराड शहरात गंभीर होत असतानाच सोमवारी बालकांवर मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे. त्यातही वाखाण परिसरासह शहरातील अन्य सर्वच भागातील कुत्री मांसाला चटावलेली आहेत. रात्रीच नव्हे तर दिवसाही ही कुत्री हल्ले करत आहेत. रात्रीच्या वेळी या कुत्र्यांच्या टोळक्यात एखादा वाहनधारक किंवा पायी चालणारा नागरिक सापडला तर त्याची भंबेरी उडते.
कुत्र्यांनी शहरात मांडलेल्या या उच्छादामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच बालकांचे लचके तोडणार्या या कुत्र्यांना कायमचे संपवा अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत. किती वर्षे ही कुत्री हल्ला करणार आणि आम्ही ते सहन करायचे अशा भावना व्यक्त होत आहेत. मांसाला चटावलेली हिंसक कुत्री नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. अनेकदा तक्रार करूनही पालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिक सांगतात तर बारा डबरी परिसरातील काही ठिकाणे म्हणजे 'मौत का इलाका' अशी अवस्था झाली आहे. लहान मुलांच्या शरीराचा लचका तोडण्यासाठी ही कुत्री सातत्याने टपलेली असतात.
मांसाला चटावलेल्या या कुत्र्यांनी अनेकदा नागरिकांवर, बालकांवर हल्ला केला आहे. 2016 मध्ये एका लहान बालिकेवर कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. मधुकर माने यांनी नागरिकांसह पालिकेत याबाबतचे निवेदन दिले होते. त्यानंतर तहसीलदार यांच्याकडेही निवेदन दिले मात्र त्यांच्याकडूनही काही कार्यवाही न झाल्याने प्रांताधिकारी यांचेकडे निवेदन दिले होते. तोपर्यंत अनेकांवर कुत्र्यांचे हल्ले झाले आहेत. 2016 नंतर 2022 पयर्र्त या कुत्र्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. तरीही याबाबत बंदोबस्त करण्यात आलेला नसल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
बारा डबरी परिसरासह सूर्यवंशी मळा,मुजावर कॉलनी, बर्गे मळा आदी ठिकाणी कुत्र्यांच्या टोळक्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. अनेकदा याठिकाणी कुत्र्यांनी ये— जा करणार्यांना चावा घेतला आहे. कुत्र्यांच्या या त्रासाला नागरिक हैराण झाले आहेत. मात्र बंदोबस्त होत नसल्याने नाईलाजाने गप्प बसत आहेत. शहरातही ही कुत्री हैदोस घालत आहेत.
कुत्र्यांच्या टोळक्यात सापडल्यावर लहान मुलांना या कुत्र्यांना प्रतिकार करता येत नाही.परिणामी तावडीत सापडलेल्या बालकांवर कुत्री हल्ला करतात. नागरिक किमान प्रतिकार करू शकतात किंवा पळून जातात मात्र लहान बालकांना असा प्रतिकार करणे शक्य होत नाही.
अॅनिमल प्रोटेक्शन क्लबकडून पालिका कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून घेत असते. मात्र त्याचे बिल देण्यास पालिका तत्परता दाखवत नाही तर नागरिकांकडूनही या क्लबला सहकार्य होत नाही. त्यामुळे या क्लबला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरात सुमारे तीन हजार कुत्र्यांची संख्या आहे. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. त्यामुळे कुत्र्यांची पिल्ले कमी प्रमाणात दिसून येतात. निर्बिजीकरणाचा खर्च मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे उर्वरित कुत्र्यांचे निर्बिजीकरण रखडले आहे.
– अमोल शिंदे
अॅनिमल प्रोटेक्शन क्लब