कराड : पुढारी वृत्तसेवा
कराड नगरपालिकेची मुदत संपून दोन महिन्यांचा अवधी पूर्ण झाला आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या या निवडणुकीची प्रभाग रचना नवनिर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. कराड शहरात किमान 1 प्रभाग वाढणार असून प्रभागांची सरासरी लोकसंख्या पाच हजार ते साडेसहा हजारांच्या घरात असणार, असा अंदाज आहे. याशिवाय नगरपालिकेतील नगरसेवक संख्या किमान दोनने वाढणार असून प्रभाग रचनेबाबत मोठी उत्सुकता पाहावयास मिळत आहे.
कराडात प्रभागाची लोकसंख्या पाच हजार ते साडेसहा हजारांच्या घरात राहण्याची शक्यता
कराड नगरपरिषदेची मुदत संपल्याने नोव्हेंबर 2021 पासून प्रशासकाकडून कारभार पाहिला जात आहे. सध्यस्थितीत कराड नगरपालिकेची नगरसेवक संख्या 29 इतकी आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कराड नगरपरिषदेत नगरसेवक संख्या किमान 2 ने वाढणार आहे. याबाबतची निश्चित माहिती लवकरच समोर येणार आहे. नगरसेवक संख्या वाढणार असल्याने शहरातील प्रभाग संख्येत आणखी एका नव्या प्रभागाची भर पडणार आहे. त्यामुळेच शहरातील प्रभागांची पुनर्रचना होणार असून नवे प्रभाग कसे असतील? नव्या प्रभागात कोणकोणत्या भागांचा समावेश असणार? आणि कोणकोणत्या भागांना वगळून नव्या प्रभागात समाविष्ट केले जाणार ? याबाबत आत्तापासून नागरिक तसेच इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता पहावयास मिळत आहे.
पुनर्रचनेनंतर होणार्या प्रभागांची लोकसंख्या पाच हजाराच्या घरात असेल, असा प्राथमिक तर्क आहे. तर एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून दिले जाणार असून या प्रभागाची लोकसंख्या साडेसहा हजाराच्या घरात असेल, असा अंदाज आहे. प्रभाग रचनेसह प्रभागातील आरक्षणही इच्छुकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रभागातील लोकसंख्याही आरक्षणावर परिणामकारक ठरते. याशिवाय ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम आहे. न्यायालय याबाबत कोणता अंतिम निर्णय घेणार? याकडेही राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्या तसेच इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. एकूणच सध्यस्थितीत इच्छुकांसह सर्वसामान्य कराडकरांच्या नजरा प्रभाग रचनेकडे लागून राहिल्याचे पहावयास मिळत आहे.
इच्छुकांनी घातले देव पाण्यात
कराड शहरात नव्याने होणार्या प्रभाग रचनेचा कोणाला फायदा होणार ? आणि कोणाला प्रभाग रचनेचा फटका सहन करावा लागणार? याबाबत आत्तापासूनच तर्कविर्तक सुरू आहेत. प्रभाग रचना आपल्या सोईची व्हावी, यासाठी अनेक इच्छुक अक्षरशः देव पाण्यात घालून बसल्याचेही पहावयास मिळत आहे.
अनेक प्रभागांतील समीकरणे बदलणार
सध्यस्थितीत असणार्या प्रभागातील राजकीय समीकरणे पुनर्रचनेनंतर नव्याने होणार्या प्रभागात पहावयास मिळतीलच असे नाही. अनेक ठिकाणी 'व्होट बँक' महत्त्वपूर्ण ठरते. मागील निवडणुकीत काही प्रभागात विशिष्ट लोकसंख्या किती महत्त्वाची ठरते ? हे निवडणूक निकालावेळी पहावयास मिळाले होते. त्यामुळेच आता नव्याने होणार्या प्रभाग पुनर्रचनेनंतर अनेक प्रभागातील राजकीय समीकरणे बदलताना पहावयास मिळणार आहेत.