कराड; पुढारी वृत्तसेवा : अनेक वेळेला आवाहन करूनही वाहनधारकांकडून नो पार्किंग झोनमध्ये सर्रासपणे वाहने लावली जात आहेत. याबाबत कराड वाहतूक शाखेने कारवाईची धडक मोहीम राबवली. यावेळी मलकापूर तालुका कराड येथील ढेबेवाडी फाट्यावरून अनेक दुचाकी क्रेनच्या सहाय्याने उचलून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दोन वर्षांच्या कोरोनाच्या महामारीनंतर यंदा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी युवकांसह गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून मोठ्या धुमधडाक्यात उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसह घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याकडे गणेश भक्तांचा कल आहे. या उत्सवासाठी कुंभार वाड्यात तसेच अनेक ठिकाणी गणेशमूर्तींची विक्री करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. गणेशोत्सव हा उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला जावा. यासाठी प्रशासनाच्या वतीने गणेश भक्तांसह सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
कराड शहरासह मलकापूर, विद्यानगरसह अनेक ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याचे लक्षात घेऊन नो पार्किंग झोन करण्यात आले आहेत. गणेश उत्सवाचे आगमन होत असताना या उत्सवामध्ये कोणतेही विघ्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे मंडप किंवा कमानी उभारण्यावर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. त्याच वेळेला वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहने उभा करणार्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. कराड शहर वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी पोलिस कार्यरत आहेत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार कराड शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी नो पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई केली.
गणेश मंडळांसह नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे. मिरवणुकीवेळी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहने लावल्यास संबंधित वाहनांवर कारवाई केली जाईल.
– सरोजिनी पाटील, सपोनि, कराड शहर वाहतूक शाखा