सातारा

उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये राडा

दिनेश चोरगे

सातारा/कोडोली; पुढारी वृत्तसेवा :  सातारा बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनावरून बुधवारी खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात जोरदार राडा झाला. भूमिपूजनाच्या एक तास आधी खा. उदयनराजेंनी तात्पुरते उभारलेले बाजार समितीचे कार्यालय जेसीबीने जमीनदोस्त केले. त्यानंतर लगेचच घटनास्थळी येऊन उदयनराजेंच्या या अ‍ॅक्शनवर आ. शिवेंद्रराजेंनी रिअ‍ॅक्शन देत प्रचंड तणावाच्या वातावरणातही उदयनराजेंसमोरच टिकाव मारून बाजार समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन केले. तब्बल दोन तास दोन्ही राजांमध्ये व त्यांच्या समर्थकांमध्ये हा राडा सुरू होता. या विषयावरून सातार्‍यात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण आहे.

सातारा बाजार समितीच्या संभाजीनगर, ता. सातारा येथील जागेवर नवीन इमारत उभारणीचे भूमिपूजन बुधवारी सकाळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार होते. यासाठी आमदार गट व बाजार समितीच्या संचालकांनी बुधवारी सकाळी महामार्गालगत असलेल्या जागेवर पत्र्याचे शेड उभे केले होते. भूमिपूजन होणार असल्याची माहिती खा. उदयनराजे यांना समजल्यानंतर ते समर्थकांसह सकाळी 9 वाजताच पोहोचले. खा. उदयनराजेंच्या समर्थकांनी यावेळी भूमिपूजनासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडची मोडतोड करण्यास सुरुवात केली.

अवघ्या पाच मिनिटांमध्ये शेड जमीनदोस्त करण्यात आले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पाहता पाहता घटनास्थळी समर्थकांची व बघ्यांची गर्दी वाढू लागली. 'ही जागा आमची आहे. इथे कोणीही पाय ठेवायचा नाही', अशी भूमिका खा. उदयनराजे भोसले यांनी घेऊन तेथेच त्यांनी तळ ठोकला. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ अतिरीक्त पोलिसांची कुमक मागवून परिसराला वेढा दिला.

भूमिपूजनाच्या जागेवर राडा सुरु असल्याची माहिती आ. शिवेंद्रराजे भोसले यांना समजल्यानंतर तेही समर्थकांसोबत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बाजार समितीचे संचालकही उपस्थित होते. आ. शिवेंद्रराजे नियोजित जागेकडे निघाले त्याचवेळी खा. उदयनराजे व त्यांचे समर्थक हे त्यांच्या पाठोपाठ जावू लागले. दोन्ही राजे व त्यांचे समर्थक आमने-सामने उभे राहिले. घटनेचे गांभीर्य पाहून पोनि हेमंतकुमार शहा दोन्ही राजेंमध्ये थांबून राहिले. याचवेळी जागेचे मालक आणि कुळांनी जागेवर बैठक मांडून 'आमच्यावर अन्याय नको', अशी मागणी केली. यावेळी दोन्ही राजे समर्थकांनी आपल्या नेत्यांच्या जयघोषाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी एकमेकांविरुध्दही घोषणाबाजीला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा वातावरण तापले. अखेर घोषणाबाजी सत्र थांबल्यानंतर दोन्ही राजेंनी आपापल्या बाजू पोलिसांपुढे मांडल्या.

दोन्ही राजेंनी एकमेकांच्या समोर उभे राहून युक्तिवाद केला. वहिवाटदार यांची ही जागा असून याची कोणतीही परवानगी आमदार गटाने घेतलेली नाही. त्यामुळे हे भूमिपूजन बेकायदेशीर आहे, अशी बाजू खासदार गटाने मांडली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या जागेचा सातबारा मार्केट कमिटीच्या नावावर झाला आहे. खासदार गटाकडे कायदेशीर कागदपत्रे असतील तर ती दाखवावी, अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी केली. यावेळी पुन्हा समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या वादातच आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मार्केट कमिटीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजनाचा टिकाव मारला व नारळ फोडला. यावेळी कुळांनी 'आमची जागा असून येथे कोणी पाय ठेवू नका', अशी भूमिका घेत दोन्ही राजांच्या समोर ठिय्या मारला. त्यांनी आमदार व मार्केट कमिटीला निषेध केला. तर आमदार गटाने जोरदार घोषणाबाजी केली.

आ. शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंच्या समोरच टिकाव मारल्याने आमदार गटाला जोरदार चेव चढला. पोलिसांनी दोघांतील वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही राजे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. हा वाद सुरू असतानाच आमदार समर्थक आणि मार्केट कमिटीच्या संचालकांनी त्याच जागेत पुन्हा नारळ फोडला व भूमिपूजन करून फटाक्यांची आताषबाजी केली. आमदार गटाने ही चाल केल्यानंतर संभाजीनगर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी त्याच जागेत खा. उदयनराजे यांच्या समोरच ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा नारळ फोडला. त्यावेळी खा. उदयनराजे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली.

ही घोषणाबाजी सुरू असतानाच वाद चिघळला आणि दोन्ही बाजूकडून रेटारेटीला सुरुवात होत समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर आ. शिवेंद्रराजे भोसले व त्यांचे समर्थक तेथून निघून गेले. सकाळी 9 वाजता ठिय्या मांडून बसलेले खा. उदयनराजे भोसले हे देखील 11.30 वाजता समर्थकांना सूचना देवून तेथून बाहेर पडले. पोलिसांचा बंदोबस्त मात्र तेथे कायम होता. या घटनेवरुन दिवसभर सातार्‍यात तणावाचे वातावरण होते.

दोन्ही गटांकडून भूमिपूजन…
आ. शिवेंद्रराजे भोसले व बाजार समिती नूतन संचालकांनी बाजार समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन केले तर खा. उदयनराजे भोसले व संभाजीनगर, खिंडवाडी ग्रुप ग्रामपंचायत सदस्यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन यावेळी केले. यावेळी दोन्ही गटांकडून फटाक्याची आतषबाजी करत घोषणाबाजी केली.

SCROLL FOR NEXT