सातारा पुढारी वृत्तसेवा: पाटण तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून तळमावले बाजारपेठ उदयास आली आहे. मात्र असे असले तरी बीएसएनलच्या इंटरनेट सुविधेचा या विभागात अक्षरशः बोजवारा उडाला आहे. इंटरनेटअभावी अनेक महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होत असून स्थानिक वारंवार होणार्या असुविधेमुळे त्रस्त झाले आहेत.
सद्य:स्थितीत मोबाईल आणि इंटरनेट मानवाचे अविभाज्य घटक बनले आहे. एक दिवस रेंज नसेल, तर संपूर्ण जग ठप्प झाले की काय? अशी अवस्था मोबाईल वापरणार्या व्यक्तीची होते. त्यामुळे मोबाईल व इंटरनेट आवश्यक बनले आहे. तळमावलेतील नागरिक बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेला अक्षरशः वैतागले आहेत.
इंटरनेटची सेवा सतत कोलमडलेली असते. त्यामुळे इंटरनेटवर आधारित कामे बंद होतात आणि याचा विपरीत परिणाम व्यवसायावर होत आहे. तळमावले मोठी बाजारपेठ असल्याने विभागातील हजारो लोक कामानिमित्त तळमावलेत येत असतात.
त्यामुळेच आता बीएसएनलच्या ग्राहक संख्येत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने लक्ष देत इंटरनेट सुविधा पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे.
तळमावले बीएसएनएलच्या इंटरनेटची समस्या कायम आहे. सर्वसामान्यांची कामे खोळंबत आहेत. त्यामुळेच बीएसएनएलच्या वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.