सातारा

आपले सरकार सेवा केंद्रांत अपहार

backup backup

सातारा : पुढारी वृत्तसेवा खटाव तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्रांच्या मोबदल्याच्या अग्रीम रकमेत (अ‍ॅडव्हान्स) 45 लाख 11 हजार 330 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. अग्रीम रकमेचे सर्व पैसे दुसर्‍याच बोगस खात्यात जमा झाले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणात प्रथमदर्शनी व्यवस्थापकाचा समावेश असल्याचेही समोर आले असून चौकशी समितीचा अहवाल येताच संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यात एकूण 811 आपले सरकार सेवा केंद्रे आहेत. आपले सरकार केंद्र चालवण्यासाठी ग्रामपंचायतींना दरमहा 12 हजार 331 ही अ‍ॅडव्हान्स रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्याप्रमाणे 1 वर्षासाठी प्रतिकेंद्र 1 लाख 47 हजार 972 रुपये ही अ‍ॅडव्हान्स रक्कम जिल्हास्तरावरील 'आपले सरकार सेवा केंद्र मोबदला' या आयडीबीआय बँकेतील खात्यावर जमा करण्यात येते. या अ‍ॅडव्हान्सच्या ताळमेळासाठी जिल्हास्तरावरुन पाठपुरावा करण्यात येतो. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून 2021-22 यावर्षासाठी 1 हजार 226 ग्रामपंचायतींची अ‍ॅडव्हान्स रक्कम 10 कोटी 31 लाख 89 हजार 422 रुपये होत असताना केवळ 9 कोटी 87 लाख 46 हजार 664 एवढीच रक्कम सेवा केंद्र मोबदला खात्यात वर्ग झाली आहे.

त्यामुळे 44 लाख 42 हजार 758 रुपये इतकी रकमेची तफावत आढळली. याबाबत चौकशी केली असता खटाव तालुक्यातील सेवा केंद्रांच्या अ‍ॅडव्हान्स रकमेत अपहार झाल्याचे समोर आले. तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींनी अ‍ॅडव्हान्स भरुन युटीआर अपलोड केल्याचे तालुका व्यवस्थापनकांनी सांगितले. परंतु, ग्रामपंचायतींनी भरणा केलेल्या बँक चलन, युटीआर क्रमांक, जिल्हास्तरावरील आपले सरकार सेवा केेंद्र मोबदला खात्याच्या चलनावरील युटीआर क्रमांक व रक्कम जुळत नसल्याचे दिसून आले.

याची अधिक पडताळणी केली असता खटाव तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र या नावाने बनावट बचत खाते आहे. त्यातून मागील तीन वर्षांत वेळोवेळी रक्कम वर्ग करुन 45 लाख 11 हजार 330 रूपयांचा अपहार झाला आहे. या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेचे सीईओ विनय गौडा यांनी ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्राने कळवले आहे. तसेच याची सखोल चौकशी करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरीत समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीमध्ये या अपहारात तालुका व्यवस्थापकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे ज्या ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यात येते अशा ग्रामपंचायतींमध्ये व व्यवस्थापकांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT