सातारा

‘आपला माणूस’ मुख्यमंत्री झाल्याने कोयनाकाठ आनंदला

सोनाली जाधव

महाबळेश्‍वर : विशेष प्रतिनिधी
कोयना काठचा निष्ठावंत शिवसैनिक व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता असलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच महाबळेश्‍वर – जावलीचे दरे-खोरे आनंदाने उल्हासित झाले असून बघावे तिकडे या भूमिपुत्राचाच जयजयकार सुरु आहे. या खोर्‍यातील प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलली असून 'आपला माणूस' मुख्यमंत्री झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर असतानाच 'दिसं जातील, दिसं येतीलं, भोग सरलं सुख येईल' ही आसही आता डोंगर-दर्‍यातील कडेकपारींना लागून राहिली आहे.
कोयनाकाठचा हा निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा कट्टर कार्यकर्ता अन् जावली-महाबळेश्‍वरचा भूमिपुत्र असलेले एकनाथ शिंदे यांचे महाबळेश्‍वर तालुक्यातील दरे तर्फ तांब हे गाव. या छोट्याशा गावातील एकनाथ शिंदे या आसामीने अवघ्या देशभर नवा राजकीय इतिहास निर्माण केला. या भूमिपुत्राने ठाण्यामध्ये जावून शिवसेनेचा ढाण्यावाघ म्हणून मिळवलेले यश जावली – महाबळेश्‍वर खोर्‍यासाठी अभिमानास्पद ठरले असताना गुरुवारी मुख्यमंत्री म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली अन् या डोंगरदर्‍यातील कष्टकरी, रांगडा, भोळाभाबडा समाज आनंद लहरीत हरवून गेला. जावली, महाबळेश्‍वरच्या दर्‍याखोर्‍यात उत्साहाला उधाण आले. रांगड्या मातीतील आपल्या हक्‍काचा भूमिपुत्र मुख्यमंत्री झाल्याच्या वार्तेने या डोंगर दर्‍याला आता विकासाची नवी पहाट पहायला मिळेल, दारीद्—य, कष्टाचे दिवस सरतील अन् सुखाचे दिन पहायला मिळतील, ही आशा आता या डोंगरदर्‍याला लागून राहिली आहे. आतापर्यंत या खोर्‍यातील कष्टकरी लोकांना विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न झाला असला तरी आता आपल्याच मातीतील मुख्यमंत्री झाल्याने जावली-महाबळेश्‍वरच्या दर्‍याखोर्‍याचा वेगाने कायापालट होणार असल्याची भावना येथील प्रत्येकाच्या मनात घर करुन राहिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातला आजवरचा सर्वांत मोठा राजकीय भूकंप घडवत बंडाचे ऐलान पुकारल्यानंतर अवघा महाराष्ट्रच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण हादरुन गेले. 10-12 म्हणता म्हणता 39 आमदार फोडून शिवसेनेचा स्वतंत्र गट तयार केला. त्यावेळी या भूमीपुत्राविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली. पण दरे गावासह जावली-महाबळेश्‍वरची जनता एकनाथ शिंदे यांच्याच सोबत कायम राहिली. त्यांच्या भुमिकेचे सर्वत्र स्वागतही करण्यात आले. आता तर प्रत्यक्षात ते मुख्यमंत्री झाल्याने येथील प्रत्येकाच्या मनात गर्वाची भावना निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे शिक्षणासाठी ठाण्याला गेले. पण, गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. त्यानंतर त्यांनी एका मासळी विकणार्‍या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम केलं. पण, त्यातून मिळकत होत नव्हती म्हणून शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांचं वय होतं 18 वर्षे. वयाच्या 18 व्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीमारही खाल्ला. मितभाषी, संयमी, पण आंदोलनात आक्रमक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर आनंद दिघेंची कृपा झाली आणि शिंदे ठाण्यातील किसननगरचे शिवसेना शाखाप्रमुख बनले.
शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात फ्रंटवर असलेल्या एकनाथ शिंदेंना 1997 हे वर्ष अत्यंत लकी ठरलं. 1997 मध्ये त्यांना आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले. या निवडणुकीत शिंदे घवघवीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. सभागृह नेते म्हणून पालिका गाजवल्यानंतर 2004 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता तर ते महाराष्ट्राचे नायक बनले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT