सातारा

अजयचे स्वप्न अवकाशातच विसावले

backup backup

परळी : पुढारी वृत्तसेवा परळी खोर्‍यातील अवकाश शास्त्रज्ञ अजय लोटेकर (वय 31) यांचे स्वीडन येथे दीड महिन्यापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे अजयचे सगळे स्वप्न आता अवकाशात विसावले असून परदेशात सातारचा झेंडा रोवायचे स्वप्नही अधुरेच राहिले आहे. या सुपुत्रासाठी परळी खोरे हेलावून गेले. दीड महिन्यानंतर या सुपुत्राचे पार्थिव  गावी शनिवारी पोहोचले. अत्यंत शोकाकूल वातावरणात या सुपुत्राला निरोप देण्यात आला.

 येथील अजय भानुदास लोटेकर हे स्वीडन येथे अवकाश संशोधन क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांनी आत्तापर्यंत 15 संशोधनात्मक पेपर प्रसिद्ध केले असून ते सध्या प्लाझमावर सुपर सॉलिटरी व्हेव्हज आणि रेग्युलर सॉलिटरी व्हेव्हज यांचा परिणाम या विषयावर त्यांचे काम सुरू होते. मात्र, हृदयविकाराने दि. 27 एप्रिल रोजी त्यांचे स्वीडन येथे निधन झाले होते.

नियतीने वयाच्या 31व्या वर्षी त्यांना हिरावून घेतले. मात्र तेथील कायदेशीर सोपस्कार पूर्ण होऊन पार्थिव येण्यासाठी सव्वा महिन्याचा कालावधी लागला. शनिवारी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कुसू बुद्रुक येथे आणण्यात आले. सुमारे साडेतीन चारच्या दरम्यान अजय लोटेकर हे अनंतात विलीन झाले. यावेळी परळी पंचक्रोशीतील जनसागर उपस्थित होता. त्यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी निता असा परिवार आहे.

अजय हे लहानपनापासूनच चाणाक्ष होते. त्यांनी आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग कुटुंबासाठी नाहीतर देशासाठी करायचा, या विचाराने मुंबईतील रूपारेल कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयात बीएस्सी शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एमएस्सी तर इंडियन इन्स्टिटयूट जिओमॅग्नेटिक्स येथून पीएचडी मिळवत गगनभरारी घेत स्वीडन गाठले होते. सध्या स्वीडीश इन्स्टिटयूट ऑफ स्पेस फिजिक्स याठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून ते काम करत होते. त्यांच्या निधनाने परळी खोर्‍याने सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT