सातारा; मीना शिंदे : दावजी पाटील मंदिरातील घटनेमुळे जिल्ह्यात अंधश्रध्देची पाळेमुळे अद्याप कायम असल्याचे समोर आले. ज्यांनी अंधश्रध्दा निर्मूलनाला बळ देण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा करण्यासाठी आपले आयुष्य वेचले त्याच डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या जन्मभूमीची शोकांतिकाच म्हणावी लागेल. यापूर्वीही मंत्र-तंत्र व नरबळीच्या अनेक घटना समोर आल्या असून भूतबाधा उतरवणे, देवीचा कोप टाळण्यासाठी जटा राखणे अशा अनेक घटनांमुळे अंधश्रध्देच्या भुताला विज्ञानाचा उतारा पचत नसल्याचे वास्तव आहे. बुवाबाजीच्या थोतांडाला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
सातारा येथील डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीव्दारे भूतबाधा व बुवाबाजीचे थोतांड कमी करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. अंधश्रध्दा निर्मूलनाला बळ देण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याच डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या जिल्ह्यात आजही अंधश्रध्देला खतपाणी घालण्याच्या घटना घडत आहेत. गुप्तधनासाठी संपूर्ण कुटंबाची हत्या घडवणार्या सांगलीच्या म्हैसाळ प्रकरणाने समाजमन ढवळून निघाले होते. त्यानंतर जिल्ह्यात पाटण तालुक्यामध्ये गुप्तधनाच्या लालसेने कुटुंबीयांकडूनच अल्पवयीन मुलीचा बळी देण्यात आला होता. मागील आठवड्यामध्ये सुरुर, ता. वाई येथील दावजी पाटील मंदिरामध्ये मंत्र-तंत्र व अघोरी विद्येचा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. जिल्ह्यात वारंवार घडणार्या बुवाबाजी, भोंदूगिरीच्या घटनांनी अंनिसचे जनक डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या जिल्ह्यात अद्याप अंधश्रध्देची पाळेमुळे कायम आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान युगात भूतबाधा, गुप्तधन, अनिष्ठ चालीरिती, बुवाबाजी अशा अनेक घटना आजही घडत आहेत. अशिक्षित व भाबड्या कष्टकरी वर्गाच्या अज्ञान व असायतेचा गैरफायदा घेत बुवाबाजीची दुकानदारी सुरू असल्याचे दाहक वास्तव समोर येत आहे. अंधश्रध्देला मूठमाती देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीबरोबरच जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी तसेच अशा केसमध्ये जास्तीत जास्त शिक्षा लागणे आवश्यक आहे.
कष्टकरी वर्ग आजही अज्ञान व अंधश्रध्देच्या प्रभावाखाली येत आहे. त्यांच्यामध्ये अनिष्ठ रुढी परंपरांचा पगडा अद्याप कायम आहे. त्यामुळे ग्रामीण भागात परडी, मांड भरणे, म्हसोबाला कोंबडा देणे, देवाचा कोप होईल म्हणून केसातील गुंत्याची जट राखणे असे प्रकार होत आहेत. मात्र, त्याकडे सोयीने दुर्लक्ष केले जाते. यातूनच पुढे नरबळीसारख्या अघोरी कृत्यांना बळ मिळते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला होणार्या छोट्या-मोठ्या घटनांमध्येही तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गजर आहे.