सातारा : जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका सदस्य आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी सोडत होणार आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणाच्या आरक्षणाची इच्छुकांना उत्कंठा लागून राहिली आहे. अनेकांनी आपल्याला सोयीचे आरक्षण पडण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत. आरक्षणानंतर दिवाळी झाल्यावर झेडपीचे फटाके फुटणार आहेत.
गट व गणाच्या आरक्षणापूर्वीच सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. यामुळे अनेक पुरुष मातब्बरांचा हिरमोड झाला होता. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या 65 गट व पंचायत समित्यांचे 130 गणांच्या आरक्षणाकडे नजरा लागून राहिल्या होत्या. या आरक्षणाची प्रतीक्षा अखेर संपली असून, दि. 13 रोजी सर्व गट व गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यानंतरच राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
जिल्ह्यात वाई तालक्यात 4 गट व 8 गण, महाबळेश्वर 2 गट व 4 गण, खंडाळा 3 गट व 6 गण, फलटण 8 गट व 16 गण, माण 5 गट व 10 गण, खटाव 7 गट व 14 गण, कोरेगाव 6 गट व 12 गण, सातारा 8 गट व 16 गण, जावली 3 गट व 6 गण, पाटण 7 गट व 14 गण, कराड 12 गट व 24 गण असे मिळून 65 गट व 130 गण आहेत. या गटगणावर कोणते आरक्षण पडणार याची आता गावोगावी चर्चा सुरू झाली आहे. यंदा प्रथमच आरक्षण सोडतीसाठी नवीन पद्धत वापरली जाणार आहे. त्यामुळे अनेक गट-गणात आरक्षणानंतर कालवा कालव होणार आहे. गाव पदाधिकार्यांना आरक्षणाचे अडाखे बांधणेही कठीण जात आहे. यासाठी अनेक इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहे.
प्रभाग रचना झाल्यानंतरच अनेक इच्छुकांनी गाठीभेटींवर भर दिला आहे. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रौत्सवातही इच्छुक गावोगावी विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. तर नवरात्रौत्सव मंडळांच्या भेटी वाढल्या आहेत. इच्छुकांना प्रचारासाठी गरबा दांडियाचे उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी मदत केली आहे.
अशी आहे आरक्षणाची प्रक्रिया
जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरता जागा निश्चितीचे प्रस्ताव 6 ऑक्टोबरला विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. यानंतर दि. 8 रोजी मान्यता व दि. 13 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. दि. 14 ऑक्टोबर रोजी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्धी, दि. 14 ते 17 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी आरक्षणावर हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. याचा अहवाल दि. 27 ऑक्टोबरला विभागीय आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर दि. 31 पर्यंत सुनावणी होऊन दि. 3 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर केले जाणार आहे.