प्रशासनाच्या दुर्लक्षाने झेडपी मैदानावरील झाडे पाण्याअभावी वाळू लागली असून दुसरीकडे सामाजिक संस्थामार्फंत झाडांना पाणी दिले जात आहे. Pudhari Photo
सातारा

मैदान झेडपीचे; झाडांची निगा संघटनांकडून

अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कामाचा भांडाफोड; प्रशासनाबाबत तक्रारींचा पाढा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत तीन वर्षांपासून प्रशासक राजवट सुरू आहे. मात्र, अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळेच झेडपी मैदानाची पुरती वाट लागल्याच्या तक्रारी आहेत. सातार्‍यातील सेवाभावी व सामाजिक संघटनांकडूनच मैदानाची, तेथील झाडांची निगा राखली जाते. सामाजिक कार्यकर्ते व संघटनाकडून झाडांना पाणी घालून ती जगवली जात आहेत. मात्र, आम्हीच टँकरने झाडांना पाणी घातले असा टेंभा अधिकारी व कर्मचारी मिरवत असल्याच्या तक्रारी आहेत.

सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीलगतच जिल्हा परिषदेचे भव्य मैदान आहे. या मैदानावर शाळा, विद्यालय यासह विविध संस्थांच्या स्पर्धा होत असतात. महोत्सव, प्रदर्शन यासारखे विविध उपक्रमही या मैदानावर होत असतात. त्यातून जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. त्यामुळे मैदानाची निगा राखण्यासाठी अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, अधिकार्‍यांचेच लक्ष नसल्याने डागडुजी होत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मैदान दुरूस्तीसाठी जो लाखो रूपये खर्च करते तो निधी कुठे मुरतो? असा सवाल केला जात आहे.

सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद मैदानावर रोज नागरिक खेळण्यासाठी व जॉगिंगसाठी येत असतात. त्यामुळे नेहमी मैदानावर गर्दी असते. या मैदान परिसरात बिल्डर असोसिएशनने झाडे लावलेली आहेत. त्याची निगाही जिल्हा परिषद प्रशासनाकडून राखली जात नाही. त्यामुळेच नागरिक व असोसिएशनच्या सदस्यांनी पैसे जमा करून टँकरने झाडांना पाणी घातले जात आहे. जिल्हा परिषद मैदानावरील क्लबच्या बाजूला नाला होता. त्याच्यावर सुध्दा बिल्डर असोसिएशनने मुरूमाची भर घातली होती. त्यामुळे झेडपीच्या या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. याचा जाब विचारण्यास गेलेल्या नागरिकांनाच फिरायला अधिकारी बंदी घालतात. त्यामुळे जाब विचारायचा की नाही? असा सवाल केला जात आहे.

दरम्यान, दै. ‘पुढारी’ने झेडपी मैदानावरील झाडे सुकल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आम्ही टँकरने झाडांना पाणी घातल्याचे सांगितले. मात्र, हे पाणी नागरिकांनीच लोकवर्गणी काढून घातले आहे. त्यामुळे झेडपी प्रशासनाच्या कामाचा भांडाफोड झाला आहे. झेडपी मैदानावरील डागडूजीसाठी पुन्हा लाखो रूपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे हे पैसे तरी मैदानावरील कामासाठी खर्च होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाने झेडपी मैदानावरील झाडे पाण्याअभावी वाळू लागली असून दुसरीकडे सामाजिक संस्थामार्फंत झाडांना पाणी दिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT