सातारा : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 3 लाख 76 हजार 774 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 23 लाख 42 हजार 787 मतदार संख्या झाली आहे. झेडपी तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी 293 नवी मतदान केंद्रे निर्माण झाली त्यांची जिल्ह्यातील संख्या 2 हजार 877 इतकी आहे. या निवडणुकीत 18 हजार 988 कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 9 हजार 494 मतदान यत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये 3 हजार 165 कंट्रोल युनिट (सीयू) आणि 6 हजार 329 बॅलेट युनिट (बीयू) यांचा समावेश आहे.
सातारा जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी तसेच पंचायत समित्यांच्या 130 गणांसाठी होणाऱ्या या निवडणुकांमुळे गावपातळीवरील राजकारणाला वेग येणार आहे. प्रशासनानेही निवडणूक तयारीला गती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानंतर जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, मतदान केंद्रांची आखणी, मतदान यंत्रांची तपासणी तसेच मनुष्यबळाचे नियोजन या सर्व पातळ्यांवर प्रशासन सज्ज झाले आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत मागील 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 3 लाख 76 हजार 774 मतदारांची वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाने गेल्या नऊ वर्षांत मतदार नोंदणीमध्ये सातत्या ठेवल्याचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे स्पष्ट आहे. मतदारसंख्या वाढल्याने मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे. एका मतदान केंद्रावर सुमारे 1 हजार 100 मतदार असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात झेडपी व पंचायत समिती निवडणुकीसाठी 293 नवी मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. त्यामुळे एकूण मतदान केंद्रांची संख्या 2 हजार 877 इतकी झाली आहे. ग्रामीण भागातील मतदारांना मतदान सुलभ व्हावे, यासाठी केंद्रांची पुनर्रचना करण्यात आली असून काही ठिकाणी नव्याने केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
ही निवडणूक पारदर्शक व सुरळीत पार पडावी, यासाठी मतदान यंत्रांची सज्जता करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 9 हजार 494 मतदान यत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये 3 हजार 165 कंट्रोल युनिट (सीयू) आणि 6 हजार 329 बॅलेट युनिट (बीयू) यांचा समावेश आहे. याशिवाय मतदान यंत्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मेमरी चिप्स, बॅटऱ्या तसेच पेपर सील, पट्टी सील, स्पेशल टॅग, पितळी सील आदि साहित्य राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. मतदान यंत्रांची पहाणी व चाचणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मनुष्यबळाच्यादृष्टीने या निवडणुकीत मोठे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील झेडपी व पंचायत समिती निवडणुकीसाठी 17 हजार 262 कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. कोणत्याही आकस्मिक परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी 10 टक्के अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एकूण 18 हजार 988 कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येणार असून निवडणूक प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.