Shivendraraje bhosale Pudhari Photo
सातारा

Shivendraraje Bhosale | जिल्हा परिषदेत भाजपला जाणूनबुजून एकटं पाडलं : शिवेंद्रराजे भोसले

रायगडप्रमाणे प्रयत्न का झाला नाही?

पुढारी वृत्तसेवा

सातारा : राज्यात जिल्हा परिषदेच्या स्वतंत्र निवडणुका लढल्या गेल्या. तेथे महायुतीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. रायगड जिल्ह्यात तीनही पक्षांच्या आमदारांमध्ये टोकाची टीका-टिपणी झाली. मात्र, त्यांनी काँग्रेस व इतर विरोधकांना सोबत न घेता महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली, तसे सातारा जिल्ह्यात घडले नाही. दोन्ही जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांशी स्वत: चर्चा केली. जिल्ह्यात जाणूनबुजून भाजपला एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले.

सातारा पालिकेच्या वतीने महादरे तलाव तसेच हत्ती तलाव परिसर पाहणीवेळी शिवेंद्रराजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याविषयी छेडले असता शिवेंद्रराजे म्हणाले, राज्यात आम्ही एकत्र काम करतो. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत स्थानिक राजकारण होते. भाजपचे 28 सदस्य असूनही या निवडीत जाणूनबुजून बाजूला ठेवण्यात येत होते. जिल्हा परिषद निवडणूक वेगवेगळी लढली असली, तरी आपण राज्यात युती म्हणून एकत्र आहोत. तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील मंत्र्यांशी चर्चा केली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषदेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असताना बहुमत गाठता आले नाही.

मात्र, बहुमत मिळाले असते आणि पदाधिकारी निवडीत आमच्याच सदस्यांना संधी देण्याची भूमिका घेतली असती, तर राष्ट्रवादी आणि सेनेला हे पटले नसते. जेथे पक्ष स्वतंत्र लढले तिथे निवडणुकीत सर्वच ठिकाणी टीका-टिपणी झाली. रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे, भरत गोगावले, महेंद्र दळवी, थोरवे या आमदारांमध्ये टोकाची टीका-टिपणी झाली असतानाही ते एकत्र आले. तिन्ही पक्षांनी रायगडमध्ये सत्ता स्थापन केली. तसा टोकाचा संघर्ष सातारा जिल्ह्यात झाला नव्हता. शिंदे हे युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असून आमचे नेते आहेत. ते जिल्ह्याचे नेतृत्व आहे. जिल्हा परिषद निवडीचा विषय आता संपला असून चांगले काम करू, असे त्यांनी सांगितले.

भाजपसोबत आल्यामुळे आ. महेश शिंदे यांची कोंडी केली जात आहे. याकडे लक्ष वेधले असता शिवेंद्रराजे म्हणाले, जि. प. अध्यक्षा प्रिया शिंदे या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीवर होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपच्या चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्या भाजपच्या असल्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांचेच नाव पुढे केले. शिवसेनेचा सदस्य फोडून अध्यक्ष केला नाही. सेना किंवा राष्ट्रवादीचे सदस्य आमच्यासोबत आले. त्यांचे नेते त्यांना सांभाळू शकले नाहीत, हे स्पष्ट आहे.

त्यांना आमची भीती का वाटते?

जिल्हा परिषदेत एकटं पाडण्याच्या प्रयत्नामागे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला भाजपचा धोका वाटतो का? असे विचारले असता शिवेंद्रराजे म्हणाले, त्यांना आमची भीती का वाटते, हे त्यांना विचारावं लागेल. शंभूराज देसाई हे एकदम ताकदीचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम चालले आहे. त्यांच्यावर विश्वास आहे. मिठी मारण्याची तयारी आहे, असे मी म्हटलं होतं; पण त्यांनी आम्हाला थोडं अंतरावर ठेवलं, असेही शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT