शिरवळ : शिरवळ एमआयडीसी परिसरात एका कंपनीलगत असणार्या चौकात जुन्या वादातून एका 22 वर्षीय युवकाचा तलवारीने वार करत निर्घृण खून करण्यात आला. बुधवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली. खून करून संशयित आरोपी स्वत:हून शिरवळ पोलिस ठाण्यात हजर झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
अमर ऊर्फ बाबू शांताराम कोंढाळकर (वय 22, रा. वडवाडी, ता. खंडाळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर तेजस महेंद्र निगडे (वय 19, रा. गुणंद, ता. भोर, जि. पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तेजसने रक्ताने माखलेल्या तलवारीसह स्वतः पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, संशयिताला खंडाळा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ येथील एका कंपनीमध्ये अमर व तेजस हे दोघे काम करत होते. काही महिन्यांपूर्वी तेजसला अमर व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली होती. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमकी उडत होत्या. बुधवारी रात्री कंपनीमधील काम संपण्याच्या वेळेअगोदर तेजस कंपनीबाहेर असलेल्या चौकातील कोपर्यावर दबा धरून बसला होता. कामावरून सुटल्याने अमर हा दुसर्या कामगारासह दुचाकीवरून घरी जात होता. यावेळी तेजसने अमरची दुचाकी थांबवली. तेथे दोघांमध्ये वाद झाल्यावर तेजसने अमरकडे दगड भिरकावला. तसेच तलवारीसारख्या हत्याराने अमरवर सपासप वार केले. त्यामुळे दुसर्या कामगाराने तेथून पलायन केले. हल्ल्यात घटनास्थळीच अमरचा मृत्यू झाल्याची खात्री करून तेजस शिरवळ पोलिस ठाण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय धुमाळ, पोलीस अंमलदार सुरज चव्हाण यांच्यासमोर तलवार बाहेर काढून ‘मी एकाला संपवले’, असे सांगत गुन्ह्याची कबुली दिली. यामुळे पोलिसही अचंबित झाले. यानंतर तेजजला ताब्यात घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री उशिरा पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी राहुल धस, पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे, किर्ती म्हस्के व कर्मचार्यांनी भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. अमर कोंढाळकर याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. मृतदेहाची तपासणी करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलिसांनी अमरचा मृतदेह शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. यावेळी पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती पवार यांना नातेवाईकांच्या मागणीनुसार लवकर शवविच्छेदन करण्याची विनंती केली. मात्र, डॉ. पवार यांनी याला नकार देत वरिष्ठ अधिकार्यांशी मी बोलले आहे. त्यामुळे मी उद्या सकाळी विचार करेन, असे सांगितले. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांना ही माहिती दिली. त्यानंतर लगेचच डॉ. पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येत शवविच्छेदन केले. यामुळे पोलिस व नातेवाईकांना मात्र त्रास सहन करावा लागला.