भुईंज/वेळे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर जोशी विहीरनजीक दुचाकीने पुढे चाललेल्या आयशरला जोरदार धडक दिली. या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री 9 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात जुबेर शब्बीर शेख (वय 26, रा. कुडाळ, ता. जावली) या युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुबेर शेख हा युवक खंडाळा येथून कुडाळला आपल्या घरी दुचाकीवरून निघाला होता. जोशी विहीर पुलाजवळ तो आला असता दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने पुढे चाललेल्या आयशर ट्रकला धडक दिली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी जुबेर हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. क्षणाचा विलंब न करता पोलिसांनी कवठे येथे त्याला उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. जुबेर हा कुडाळ परिसरात फोटोग्राफीचे काम अनेक वर्षांपासून करत होता. तसेच यूट्यूब चॅनलचा तो पत्रकारही होता. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र, त्यातून तो सुखरूप बचावला होता.