तारळे, पुढारी वृत्तसेवा : तारळी नदीवर असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्यावर मित्रांसोबत पोहायला गेलेल्या सतरा वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार धर्मेंद्र लोहार असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच लोहार कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
बंधार्यात पाणी साठविण्यासाठी लोखंडी प्लेट लावून पाणी अडविण्यात आले असून त्या प्लेट योग्य पद्धतीने न बसविल्याने त्यात पोहताना ओंकारचा पाय अडकल्याचे समोर आले आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या चुकीच्या कामाचा बळी गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओंकार बारावीला गेला आहे. वडील धर्मेंद्र हे लोहार काम करतात. आई गृहीणी आहे.
त्याचा मोठा भाऊ सुध्दा शिक्षण घेत आहे. ओंकार हा हुशार व चुणचुणीत असल्याने तो सर्वांचा लाडका होता. त्याचा मित्र परिवारही मोठा आहे. तो पट्टीचा पोहणारा बनला होता. पण गुरुवार मात्र त्याचा घातवार ठरला.
तारळी धरणाच्या पाण्यावर विभागातील शेती पाण्याखाली यावी यासाठी तारळी नदीवर अनेक कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. उन्हाळ्यापर्यंत नदीला पाणी रहावे यासाठी मोठ्या लोखंडी प्लेट टाकून पाणी अडवले जाते. यासाठी कृष्णा खोरेकडून ठेकेदाराची नेमणूक केली आहे.
ओंकार नेहमीप्रमाणे मित्रांसोबत धनगरवाडी नजीक असणार्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्यावर दुपारी चारच्या सुमारास पोहायला गेला होता. पोहत असताना अचानक ओंकार दिसत नसल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्यांनी इकडेतिकडे बघितले पण तो निदर्शनास आला नाही. मित्रांनी नातेवाईकांना कल्पना दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
काही तरूणांनी पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. एका दरवाजाजवळ त्याचा मृतदेह हाताला लागत होता. पण त्याचे दोन्ही पाय लोखंडी प्लेटमध्ये अडकले होते. युवकांनी दोरीच्या सहाय्याने एकएक दरवाजा वर घेतला. पाणी कमी झाल्यानंतर ओंकार अडकलेल्या प्लेटपर्यंत तरूण पोहचले. लोखंडी प्लेट निघाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तीन तासांच्या अथक मेहनतीनंतर ओंकारचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. कृष्णा खोरेच्या गलथान कारभाराने एका युवकाचा हकनाक बळी गेल्याचा आरोप करण्यात येत असून संबंधित अधिकारी व ठेकेदाराच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे.
गावाला जाणार होता पण एसटी चुकली
ओंकार गुरुवारी दुपारी कोल्हापूरला नातेवाईकांकडे सुट्टीसाठी जाणार होता. पण एसटी न मिळाल्याने त्याचे जाणे रद्द झाले. यानंतर तो पोहायला गेला होता. तेथेच तो काळाच्या फेर्यात अडकला. या घटनेने लोहार कुटुबिय व त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे.